बंगळुरू : सोन्याच्या तस्करीत थेट सहभागी असल्याप्रकरणी कानडी अभिनेत्री रान्या रावला दोषी ठरवण्यात आले आहे. रान्याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. हा आदेश परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंधक कायदा (COFEPOSA) सल्लागार मंडळाने दिला आहे. रान्या रावसह इतर दोन आरोपींनाही एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षा भोगत असतानाच्या काळात तिन्ही आरोपींना जामिनासाठी अर्ज करता येणार नाही, असेही निकालात नमूद आहे. यामुळे तिन्ही आरोपींना एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
रान्याने माणिक्य या चित्रपटात सुदीपसोबत साकारलेली भूमिका गाजली होती. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतून रान्याने काम केले होते. पण सोन्याच्या तस्करीत पकडली गेल्यामुळे रान्याचे करिअर संकटात सापडले आहे. रान्या रावला याच वर्षी ३ मार्च रोजी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४.८ किलो सोन्यासह महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली होती. रान्या वारंवार परदेशी जात येत होती. यामुळे तिच्या परदेश दौऱ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. अखेर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सापळा रचून रान्याला अटक केली. रान्याला जेव्हा अटक झाली तेव्हा ती दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने बंगळुरूला आली होती.
रान्याने कपड्यांमधून सोनं लपवलं होतं. पण तपासणीत रान्याकडे असलेलं तस्करीचं सोनं पकडलं गेलं. रान्याचे वडील रामचंद्र राव हे एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे रान्या प्रत्येकवेळी परदेशातून आल्यावर वडिलांचे नाव सांगून तपासणी हुशारीने टाळत होती. पण महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईमुळे रान्याचे बिंग फुटले. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) रान्या रावविरुद्ध ईसीआयआर दाखल केला होता. रान्या विरोधात ईडीने ४ जुलै २०२५ रोजी कारवाई केली होती. बंगळुरूतील व्हिक्टोरिया लेआउटमधील एक घर, अर्कावती लेआउटमधील एक भूखंड, तुमकुरमधील एक औद्योगिक जमीन आणि अनेकल तालुक्यातील शेती जमीन जप्त करुन ईडीने कारवाई केली. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ३४.१२ कोटी रुपये आहे.