मुंबई : 'रोटी कपडा और मकान' या १९७४ च्या हिंदी चित्रपटामुळे प्रेक्षकांना लक्षात असलेले तसेच 'ओम नमः शिवाय' आणि 'अदालत' सारख्या हिट टीव्ही शोमुळे लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते आणि टीव्ही मालिकांचे निर्माते धीरज कुमार यांचे मंगळवारी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
मागील काही दिवसांपासून न्यूमोनिया या आजाराने धीरज कुमार त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईत अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी त्यांचे रुग्णालयात निधन झाले. ताप, सर्दी, खोकला यांचा त्रास वाढल्यामुळे शनिवार १२ जुलैपासून धीरज कुमार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच धीरज यांनी अखेरचा श्वास घेतला. धीरज कुमार यांच्यावर बुधवारी सकाळी मुंबईत पवनहंस स्माशभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
धीरज कुमारने १९७० मध्ये 'रातों का राजा' या चित्रपटातून त्यांनी मुख्य भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि नंतर रोटी कपडा और मकान (१९७४), सरगम (१९७९) आणि क्रांती (१९८१) यासारख्या अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये काम केले. पंजाबी चित्रपटसृष्टीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली, १९७० ते १९८४ दरम्यान २० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. नंतर १९८६ मध्ये, त्यांनी क्रिएटिव्ह आय लिमिटेड ही एक निर्मिती संस्था स्थापन केली, जी भारतीय टेलिव्हिजन कंटेंटला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, विशेषतः पौराणिक आणि कौटुंबिक नाटक शैलींमध्ये. त्यांच्या बॅनरखाली, कुमार यांनी १९९७ ते २००१ पर्यंत दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ओम नमः शिवाय सारख्या शाश्वत मालिकांची निर्मिती केली, ज्यात श्री गणेश, घर की लक्ष्मी बेटियां, रिश्तों के भंवर में उलझी नियती आणि कोर्टरूम ड्रामा अदालत यांचा समावेश होता.