लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांचे बुधवार १६ जुलै २०२५ रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे आहेत. डॉ. दीपक टिळक यांचे पार्थिव आज सकाळी आठ ते अकरा या वेळेत पुण्यातील टिळकवाडा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. अंत्यसंस्कार दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहेत.
डॉ. दीपक टिळक यांनी टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेला. ते शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी संस्थेच्या कार्यात मोलाचे योगदान दिले. त्यांचे वडील जयंत टिळक हे गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते होते.
जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांना जपान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून गौरविण्यात आले होते. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. दीपक टिळक यांनी दीर्घकाळ काम केले.