मुंबई : पुढील पाच महिन्यात मुंबई आणि ठाणे या दोन्ही महापालिकांसह राज्यातील अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकांना निवडणूक सज्जता मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. शिवसैनिकांना लवकरच एक मोबाईल अॅप दिले जाणार आहे. या अॅपच्या मदतीने शिवसैनिक निवडणुकीची तयारी सुरू करतील.
पुढील आठवड्यापासून शिवसेनेची जिल्हानिहाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिरं होणार आहेत. शिवसेनेच्यावतीने बोगस मतदार शोधण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे. हक्काचे मतदार यादीत आहेत की नाही याची खात्री शिवसैनिक करुन घेणार आहेत. मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदानासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले जाणार आहे. ऐन निवडणूक काळात सुटी घेऊन मतदार सहकुटुंब फिरायला निघून जातात. हा प्रकार टाळण्यासाठी शिवसैनिक मतदारांशी संवाद साधणार आहेत.
शिवसेनेच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये अथवा कृती करण्याचे प्रकार मागील काही दिवसांत घडले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व लोकप्रतनिधी तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना कडक शब्दात कानपिचक्या दिल्या आहेत.
'गेल्या काही दिवसांत काही गोष्टी घडल्या …तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं.... तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारतात ?.... तुम्ही सगळी माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे. चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका. कमी बोला जास्त काम करा..... आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे मला कावाई करण्यास भाग पडेल असे कृत्य करणे टाळा. तुमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे'; असे एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना सांगितले.
'मी रागावत नाही. मी प्रमुखासारखं वागत नाही. कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्हीही तसंच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे असंच समजून कामं करा . कमी वेळात जास्त यश मिळालंय. लोकं आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात. ती काळजी घ्या'; असेही एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना सांगितले.