लंडन: लॉर्ड्स कसोटीचा शेवटचा क्षण अतिशय भावूक झाला होता. मोहम्मद सिराजची शेवटची विकेट पडली आणि भारताला या कसोटीत २२ धावांनी पराभव सहन करावा लागला. सिराजने रवींद्र जडेजासोबत खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केले मात्र नशिबाने त्याला साथ दिली नाही. धीम्या वेगाने येत असलेला बॉल त्याच्या बॅटला लागून स्टम्पवर आदळला आणि तो तेथेच बसून रडू लागला.
भारताची धावसंख्या ८ बाद ११२ असताना नितीश कुमार रेड्डीची विकेट लंचआधी पडली. त्यानंतर असे वाटत होते की सामना येथेच संपला. मात्र जडेजाने हार मानली नव्हती. तो ६१ धावांवर नाबाद राहिला. त्याने जसप्रीत बुमराह आणि सिराजसोबत मिळून लढाई लढण्याचा प्रयत्न केला.
बुमराहसोबत जडेजाने ३५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे सामना तिसऱ्या सत्रापर्यंत खेचता आला. बुमराहने ५४ बॉलमध्ये ५ धावा केल्या. यानंतर सिराजने खेळपट्टीवर टिकून राहत सामना रोमहर्षक बनवला. भारताला शेवटच्या सत्रात ३० धावांची गरज होती.
सिराजच्या डोळ्यात तरळले अश्रू
यातच शोएब बशीर गोलंदाजीसाठी आला. ७५व्या षटकांत सिराजने पहिला बॉल रोखला. मात्र दुसरा बॉल त्याला बॅटला लागून हळूनच स्टम्पवर गेला. भारताच्या पराभवानंतर हॅरी ब्रूक, ज्यो रूट आणि बेन स्टोक्स सांत्वना देण्यासाठी आले.