नवी दिल्ली : अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ अपघातप्रकरणी प्राथमिक तपास झाला आहे. एएआयबीच्या तपासानंतर प्राथमिक अहवाल दिला आहे. बोईंग ७८७ प्रकारच्या व एआय १७१ या क्रमांकाच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर आक्षेप घेत वैमानिकांच्या संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या अहवालामध्ये एक वैमानिक दुसऱ्याला ‘इंधन पुरवठा का बंद केला?’ असे विचारताना ऐकू येत आहे. त्यावर दुसऱ्या वैमानिकाने ‘मी नाही केले’ असे उत्तर दिले. अशा प्रकारचे संभाषण झाल्याचे समोर आले आहे. हे संभाषण या अपघातासाठी गृहीत धरू नये, असे एअरलाईन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने (अल्फा) म्हटले आहे. ‘अहवालातील माहिती आणि चौकशीची दिशा ही पायलटच्या चुकीकडे झुकते आहे.
चौकशी समितीमध्ये अनुभवी वैमानिकांचा अभाव
या अपघाताच्या चौकशी प्रक्रियेत आवश्यक आणि अनुभवी व्यक्तींना, विशेषतः विमान चालवणाऱ्या लाईन पायलट्सना सहभागी करण्यात आलेले नाही. विशेषतः लाईन पायलट्स अजूनही चौकशी समितीत सामील नाहीत, असा आरोप अल्फाने केला आहे.
निष्कर्ष काढण्याची घाई करू नये
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा अहवाल केवळ प्राथमिक स्वरूपाचा असून, अंतिम निष्कर्ष येईपर्यंत निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, असे आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी केले. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही वैमानिकांमधील संवाद संक्षिप्त असल्याने केवळ बोलण्याच्या आधारावर निष्कर्ष काढता येणार नाही, असे सांगितले.