
बीड : भाजपचे दिवगंत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्याही राजकारणाच्या मैदानात उतरली असल्याचं दिसून येत आहे. यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँक निवडणुकीत काल शेवटच्या (शुक्रवारी, दि. ११) दिवशी उमेदवारी अर्ज भरला आहे. यशश्री मुंडेंसोबत माजी खासदार प्रितम मुंडेही या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यानंतर मुंडे घराण्यातली तिसरी कन्या यशश्री मुंडे देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीनिमित्त यशश्री मुंडे यांनी अर्ज भरला आहे. मुंडे यांची तिसरी कन्याही राजकारणाच्या मैदानात उतरली असल्याचे दिसून येत आहे. यशश्री मुंडे या पेशाने वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' म्हणून गौरवही करण्यात आला. यशश्री यांनी शिक्षण इंग्रजी शाळेतून पूर्ण केले आहे. इतकी वर्षे त्या राजकारणापासून काहीशा दूर असल्याच्या दिसून आल्या होत्या. मात्र आता वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे, या निवडणुकीच्या निमित्ताने तिसऱ्या मुलीचे लॉन्चिंग होत आहे.
१४ जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी आणि १५ ते १९ जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून १० ऑगस्टला मतदान तर १२ रोजी मतमोजणी होणार आहे.