
मुंबई: शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यातते बनियानमध्ये बसले असून, समोर पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ नेमका कोणी काढला? आणि त्या बॅगेत नेमके काय होते? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. ज्यावर संजय शिरसाटांनीच खुलासा केला आहे.
बेडरुममधल्या व्हिडीओबाबत काय म्हणाले शिरसाट?
शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ते बनियानमध्ये बसले असून, त्यांच्या समोर पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. मात्र संजय शिरसाट यांनी यावर खुलासा देताना म्हंटले कि, ती कपड्याची बॅग होती, आणि त्याच्यावर वर फक्त पैसे ठेवले होते. शिवाय हा व्हिडीओ त्यांच्याच बेडरुममधील असल्याची पुष्टीदेखील त्यांनी केली. मी प्रवास करून आलो असल्याने बेडवर माझ्या कुत्र्यासह बसलो होतो. तसंच घरी असल्याने बनियानमध्ये होतो असे त्यांनी सांगितले.
संजय शिरसाटांनी पैसांबाबत केला खुलासा
व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर संजय शिरसाट यांनी विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं. "व्हिडीओत दिसत आहे ते माझं घर आणि बेडरुम आहे. बनियानमध्ये बसलो असून, बाजूला लाडका कुत्रा आहे. तसंच बॅग ठेवलेली दिसत आहे. याचा अर्थ मी प्रवासातून आलो आहे, कपडे काढले आहेत आणि बेडवर बसलो आहे. अरे मुर्खांनो पैशांची इतकी मोठी बॅग ठेवायची तर कपाटं काय संपलीत का? नोटा कपाटात ठेवल्या असता ना. यांना पैशांशिवाय काही दिसत नाही. एकदा एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरले असता त्यांच्या बॉडीगार्डच्या हातात पैशांच्या बॅगा असल्याचं यांना वाटत होतं. यांना कपडे ठेवायला नाहीतर पैसे ठेवायला बॅगा लागतात असं यांचं वर्तन आहे".
व्हिडीओ कोणी काढला या प्रश्नावर शिरसाट काय म्हणाले?
बेडरुममधील व्हिडीओ कोणी काढला यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता, त्यांनी एखाद्या उत्साही कार्यकर्त्याने काढला असावा असं म्हणत विरोधकांना टोमणा मारला. माझं घर म्हणजे मातोश्री २ नसून , माझ्या घरात सर्वांना प्रवेश मिळतो. त्यामुळे त्यापैकी एखाद्याने उत्साही व्यक्तीने व्हिडीओ काढला असेल, असा टोला त्यांनी उबाठाना लगावला. आमच्याकडे चिठ्ठ्या पाठवून प्रवेश दिला जात नाही. काम काय? नाव काय? असे प्रश्न विचारुन आत घेतलं जात नाही. कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत. बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आजही लक्षात ठेवली आहे. व्हिडीओ कोणी काढला असेल तर त्यात काही गैर किंवा गैरसमजाचं कारण नाही". असे देखील ते पुढे म्हणाले.
आमच्या बॅगा पाहण्यापेक्षा आपलं चारित्र्य पाहा. जाणुनबुजून टार्गेट करणाऱ्यांना मी उत्तर देऊ शकतो याची कल्पना आहे. पण माझ्यावर याचा काही परिणाम होत नाही असंही ते म्हणाले.