माझे कोकण : संतोष वायंगणकर
कोकणात पावसात पर्यटन स्थळांना बहर येतो. पावसाळ्यात या हिरवळीचेही एक वेगळं आकर्षण पर्यटकांना असतं. डोंगर-दऱ्यांतून वाहणारे झरे, डोंगर उतारावरचे धबधबे हे तर कोकणात जागो-जागी दिसतील. मात्र ही पर्यटनस्थळं कशा पद्धतीने विकसित करता येतील, इथे नव्याने काय करता येईल, याचा अहवालही नुकताच राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र हा मुद्दा केवळ भाषणांपुरता मर्यादित राहू नये...
कोकणात सर्वच ऋतूंमध्ये पर्यटनासाठी मोठा वाव आहे. म्हणूनच गेल्या तीस वर्षांत कोकणातील पर्यटनस्थळं पर्यटकांच्या गर्दीने बहरलेली असतात. कोकणातल्या पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कितीतरी म्हणजे मोजता येणार नाहीत इतकी पर्यटनस्थळं आहेत. या पर्यटनस्थळांचा पर्यटकांनी पर्यटन स्थळ करायचे ठरवले तरीही बरेच काही हातचे राहून जाईल, अशी स्थिती आहे. गोवा राज्याच्या नजीक असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबईचा एक भाग बनून राहिलेला ठाणे, पालघर, रायगड हे जिल्हे पर्यटनासाठीही विकसित होत असले तरीही खऱ्या अर्थाने पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील पर्यटनस्थळांना आहे.
देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून १९९७ साली महाराष्ट्रातील त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. त्यानंतर कोकणातील पर्यटनस्थळ कोणती आहेत, ती कशा पद्धतीने विकसित करता येतील, यासंबंधीचा टाटा कन्सल्टन्सीकडून सर्व्हे करण्यात आला. टाटा कन्सल्टन्सीकडून कोणती पर्यटनस्थळं कशा पद्धतीने विकसित करता येतील, त्यात नव्याने काय करता येईल याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला; परंतु कोकणच्या दुर्दैवाने कोकणातील पर्यटन व्यवसायातून आर्थिक समृद्धी येऊ शकते, महाराष्ट्राच्या तिजोरीत मोठी भर घातली जाऊ शकते, हा आर्थिक सक्षमतेचा विचार राज्यकर्त्यांच्या भाषणांपुरता मर्यादित राहिला तो प्रत्यक्षात साकारला गेला नाही. त्यामुळे कोकणातील पर्यटन हे पर्यटकांची गरज म्हणून वेगवेगळी पर्यटनस्थळं समोर येत गेली.
कोकणात पावसाळ्यातही अनेक पर्यटनस्थळं आहेत. पावसाळ्यात कोकणात सगळीकडे हिरवगार असतं. कोकणातील कोणत्याही भागात झाडेझुडपे आणि सारा परिसर हा हिरवा असतो. या हिरवळीचंही एक वेगळं आकर्षण पर्यटकांना असतं. डोंगरदऱ्यांतून वाहणारे झरे, डोंगर उतारावरचे धबधबे हे तर कोकणात जागो-जागी दिसतील. कोकणातील घाट रस्त्यांवरही आकर्षक धबधबे आहेत. म्हणूनच कोकणात पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.
कोकणात नव्याने उद्योगांची चर्चा सुरू झाली तरीही कोणत्याही उद्योगाला विरोध हा ठरलेलाच असतो. मग तो उद्योग कोकणाला पूरक असो किंवा कोकणासाठी हानिकारक असला तरीही त्या चर्चेत येणाऱ्या उद्योगाला पहिला विरोध हा ठरलेलाच असतो. कोणत्याही प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची एक मानसिकता बनून गेेली आहे. यामध्ये लोकहिताचा विचार कमी आणि राजकारण अधिक अशी स्थिती आहे. विरोधासाठी विरोध या एका गोष्टीने कोकणात काही गोष्टी येऊ शकल्या नाहीत. सी वर्ल्ड सारखा कोकणाच्या पर्यटनाचं चित्र बदलू शकणारा प्रकल्प केवळ राजकारणातून होऊ शकला नाही.
आज नुकसान कोकणचं झालं. एकीकडे पर्यटन विकासाच्या आणि कोकणच्या संस्कृतीच्या नावाने गळा काढणाऱ्यांनीच कोकणच्या पर्यटन प्रकल्पांना सातत्याने विरोध केला. तीस वर्षांपूर्वी ताज, ओबेरॉय सारखी हॉटेल कोकणच्या किनाऱ्यावर उभी राहणार होती; परंतु ती उभी राहू शकली नाहीत. केवळ विरोधामुळेच कोकणात आज जे काही पर्यटक येतात त्यांची संख्या आणखी दुपटीने वाढली असती; परंतु अनेक प्रकल्प येण्यापासून विरोधामुळे येऊ शकले नाहीत. आता कोकणात नव्याने उद्योजक फार कोणी यायला उत्सुक नाहीत. यामुळे नव्याने कोणताही प्रकल्प येत नाही, काही होत नाही. काही होण्यापूर्वीच जो होणारा विरोध आहे या विरोधाचा एक मोठा परिणाम उद्योगक्षेत्रावर झाला आहे. कोकण म्हटलं की, नको रे बाबा असंच काहीसं नकारात्मक असलेलं वातावरण बदलावं लागेल. त्यासाठी निश्चितच काही कालावधी जावू द्यावा लागेल. कोकणात कोणताही उद्योग येण्यासाठी जनतेनेही सकारात्मक मानसिकता तयार केली पाहिजे. शंका-कुशंकानी आपले आजवर फार मोठे नुकसान झाले. याचा विचार राजकारणी करणार नाहीत. तो विचार आपणच करायला हवा. पर्यटन प्रकल्पांच्या बाबतीतही सरकारकडून काही निर्णय झाले पाहिजेत.
कोकणातील पुरातन मंदिर, कातळशिल्प अशा कितीतरी वेगळ्या गोष्टीतून पर्यटन वाढू शकत. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी १९९७ साली सिंधुुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पर्यटन क्षेत्र विकसित करण्याच्या कामाला आजही अधिक गती मिळाली पाहिजे. कोकणात पर्यटन स्थळांकडे जाणारे अरुंद रस्ते ही फार मोठी समस्या आहे. अर्धा फूट जागा देण्याची आजही मानसिकता नाही. या अशा बदलांशिवाय पर्यटन प्रकल्पही मार्गी लागणार नाहीत आणि पर्यटन व्यवसाय देखील वाढणार नाही. त्यामुळे कोकणामध्ये पर्यटन व्यवसायाला मोठा वाव आहे.
गोव्याला पर्यटक मोठ्या प्रमाणावर जातात; परंतु कसीनो, दारू याची असणारी सहजची उपलब्धता यामुळे साहजिकच पर्यटकांचा ओघ गोव्याकडे अधिक राहातो; परंतु गेल्या काही वर्षांतील गोव्यातील बदलत गेलेल्या वातावरणाचा परिणामही पर्यटन व्यवसायावर झालेला दिसतो. यामुळे साहजिकच गोवा राज्यातील एकूणच वातावरणात गुदमरलेला पर्यटक कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गात पर्यटनासाठी येताना दिसताे. विशेषकरून कोकणच्या किनारपट्टीवरही मोठ्या संख्येने देशी-परदेशी पर्यटक येताना दिसतात. पर्यटन क्षेत्रातही नवनवीन बदल घडत आहेत. पूर्वी फक्त समुद्रकिनाऱ्यांवर फिरणारा पर्यटक होता.
पावसाळ्यात डोंगर-दऱ्यांतून वाहणारे झरे आणि धबधबे यांचा आनंद घेणारा पर्यटक, गजबजलेल्या शहरी भागातून रोजच्या धकाधकीच्या जीवनपद्धती, धावपळ याला कंटाळलेला एक वर्ग समाजात आहे. अशांना गाव-खेड्यातील साध्या कौलारू घरातून राहायला आवडतं, कोकणात निवास-न्याहरीसारख्या योजनांमधू्न पर्यटन व्यवसायात ‘निवास-न्याहरी’ची संकल्पना पुढे आली. यातून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना रोजगाराची एक नवी संधी प्राप्त झाली. अलीकडे तर कोकणात येणाऱ्या पर्यटकाला शेतीच्या कामातूनही आनंद घ्यायला आवडतो. भातशेतीत काम करत शेतातल्या जेवणाचा, नाश्ताचा आनंद घेणारेही पर्यटक आहेत. शेतीतून आनंद घेणारे पर्यटक शेती कामाच्या पर्यटन व्यवसायातही काही शेतकरी कुटुंब पर्यटन व्यवसाय म्हणून पुढे येत आहेत.
कोकणातील पर्यटन व्यवसायात अशा अनेक पद्धतीने बदल घडत आहे. या सर्व बदलाचा सकारात्मक परिणाम पर्यटन व्यवसायावर होताना दिसतो. कोकणच्या पर्यटन व्यवसायात नजीकच्या काळात जी बंदरे विकसित होतील त्या विकसित होणाऱ्या बंदरांमध्येही पर्यटनस्थळ विकसित होतील. येथील पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करतील, खिळवून ठेवतील अशी अनेक पर्यटनस्थळं आहेत. त्या पर्यटनस्थळांचे मार्केटिंग आपणच करायला हवं. कोकणातील काही ठरावीकच पर्यटनस्थळांची जर चर्चा होत असेल तर अन्य पर्यटनस्थळं चर्चेत येण्यासाठी त्या-त्या पातळीवर अगदी गावपातळीवरून प्रयत्न करायला हवे. शासनस्तरावर जेव्हा काही व्हायचं असेल ते होईलच; परंतु तत्पूर्वी गावपातळीवर आपणच यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, तरच कोकणातील पर्यटन आणखी बहरेल, वाढेल एवढं निश्चित!