कांदा-टोमॅटोतील तोट्यानंतर शेतकऱ्यांचा कोबीकडे मोर्चा

कळवणमध्ये कोबी लागवडीत मोठी वाढ


कळवण : यावर्षी कांदा आणि टोमॅटो पिकांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोबी लागवडीचा पर्याय निवडला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तींनी पिकांचे नुकसान केल्याने शेतीत होणारा तोटा भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कोबीला पसंती दिली असून, यंदा तालुक्यात अंदाजे ४०० ते ५०० एकर क्षेत्रावर कोबीची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ४० ते ६० एकराने वाढले आहे.


नैसर्गिक आपत्त्यांनी पिकांचे नुकसान:


गेल्या वर्षभरापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अपवाद वगळता, मागील वर्षी सर्वच महिन्यांत पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. अति पावसामुळे कांदा लागवड उशिरा झाली, परिणामी अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
मे महिन्यातील उष्णता आणि अवकाळी पावसाने उरलेले पीकही खराब झाले. मिरचीलाही पाऊस आणि कमी बाजारभावाने फटका बसला. यानंतर टोमॅटोमधून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती, पण सततच्या पावसामुळे त्यावरही पाणी फेरले गेले.


कोबी पिकाची निवड:


या सर्व परिस्थितीत कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कोबी पिकाकडे मोर्चा वळवला आहे. सध्याच्या पावसाळी वातावरणाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोबीची लागवड करण्यात आली आहे. जर असेच अनुकूल वातावरण राहिले, तर शेतकऱ्यांना इतर पिकांमधील नुकसान भरून काढता येईल अशी आशा आहे. गुजरात, मुंबई, मालेगाव, जळगाव आणि नाशिक येथे कोबीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणचे बहुतांश व्यापारी थेट बांधावर माल खरेदी करण्यासाठी येत असल्याने शेतकऱ्यांचा पीक काढण्याचा आणि विकण्याचा त्रास खूप कमी होतो.


मेहनतीचे पण शाश्वत पीक:


भगवान पाटील, दह्याणे (बर्डे) येथील कोबी उत्पादक शेतकरी सांगतात, "इतर पिकांच्या तुलनेत कोबी पिकामुळे तोटा होण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
हे पीक कमी दिवसांत येत असले तरी त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि पोटाच्या मुलांप्रमाणे जपावे लागते. सध्याच्या घडीला इतर पिकांनी निराशा केल्यामुळे कोबी पिकाकडून खूप अपेक्षा आहेत. यामुळे तालुक्यात कोबी लागवड मोठ्या प्रमाणात दिसत आहे."


उत्पादनाचा खर्च आणि उत्पन्न:


साधारणपणे ४५ ते ६० दिवसांचे पीक असलेल्या कोबीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी ७० हजार ते १ लाख रुपये खर्च येतो. एका एकरमध्ये २० टन कोबीचे उत्पादन मिळते. जर बाजारभाव १५ ते २५ रुपये प्रति किलो मिळाला, तर एकरी ३ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. यामुळे या पिकाला शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जात आहे.


बियाणे विक्रीत वाढ:


कळवणमधील सप्तशृंगी ॲग्रोचे संचालक सुधाकर खैरनार यांनी सांगितले की, "कळवण तालुक्यात व आसपासच्या भागात अंदाजे ८०० ते १००० किलो कोबी बियाण्याची विक्री झाली आहे. काही शेतकऱ्यांनी नर्सरीमधून तयार रोपेही घेतली आहेत. यावर्षी 'युरो २', 'वीर ३३३ डॉलर' या कोबीच्या वाणांबरोबरच इतर वाणांनाही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होती."

Comments
Add Comment

अतिवृष्टीमुळे गोदामाईला पूर

नागरिकांना सावधानतेचा इशारा नाशिक : शहरासह जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे

Gunaratna Sadavarte Attack: गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

जालना: मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे अ‍ॅडव्होकेट

Nashik Journalist Beating: त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला, मारहाणप्रकरणी मोठी अपडेट

नाशिक: नाशिक त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात पत्रकारांना काही गावगुंडांकडून

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

नाशिक: नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे?

या प्रश्नाचे खरे उत्तर देण्याची छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या सुशिक्षित नेत्यांकडे मागणी नाशिक : मराठा

नाशिक इंडस्ट्रियलची डेस्टिनेशनकडे वाटचाल

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅब ही ऊर्जा मीटर्स ट्रान्सफार्मसी ऑइल इन्सुलेशन प्रयोग शाळा, केबल,