मुंबई: आषाढी एकादशी आटोपली की, भाविकांना सण, उत्सवांचा महिना श्रावणाची चाहुल लागते. यंदा गुरुवार, २४ जुलैला आषाढ आमावस्या आटोपली की, २५ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात सृष्टीला जसा पाना, फुलांनी बहर येतो, त्याचप्रमाणे सण-उत्सवांचीही चंगळ राहणार आहे. चारही श्रावण सोमवारी शहरातील गडगडेश्वर, तपोवनेश्वर, कोंडेश्वर, पाताळेश्वर, भुतेश्वर तसेच इतर लहान, मोठ्या मंदिरांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी होणार असून, उत्साह, लहान यात्रा असे धार्मिक वातावरण राहणार आहे. शिवलिंगाचा शृंगार, बिल्वपत्रांचा अभिषेक, महाआरती, पूजा असे विधी पार पाडले जाणार आहेत.
श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीला मंदिरांसह घरोघरी नागदेवतेची पूजा होणार असून लाह्या, फुटाणे, वटाणे, करंजीचा फुलोरा, हलव्याचा प्रसाद घरोघरी करून त्याचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान सुवासिनी श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरीचे व्रतही करतील. ८ ऑगस्टला नारळी पौर्णिमा तसेच ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. बहीण भावाच्या मनगटावर प्रेमाचे अतूट रेशमी बंध बांधून त्याला नेहमी रक्षण करत राहा, अशी गळ घालणार असून, या दिवशी बहिणी भावाच्या घरी किंवा भाऊ बहिणींच्या घरी जाऊन हातावर राखी बांधतील.
शुक्रवार १५ रोजी राष्ट्रीय उत्सव स्वातंत्र्य दिन शासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालयांसह विविध ठिकाणी साजरा होणार असून, याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरोघरी श्रीकृष्णाचा पाळणा, मूर्तीचे पूजन होणार आहे. शहरातील श्रीकृष्ण मंदिरांसह इस्कॉन मंदिरात याप्रसंगी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील पिठोरी अमावास्या २२ ऑगस्ट रोजी असून, या दिवशी जिल्ह्यात पोळ्याचा सण साजरा होणार आहे. पोळ्याला बैलजोड्यांना सजवून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जाणार आहे. पोळा या सणाला मराठी श्रावण महिन्याचा समारोप होत असतो. तान्हा पोळ्याला मातीसह लाकडी बैलांची पूजा केली जाणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण महिन्यात सण, उत्सव, व्रत, वैकल्ये केली जातात.
श्रीकृष्ण जन्माष्टमी कावड यात्रेचीही राहणार धूम श्रावण महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात तीन मोठ्या दहिहंडीचे आयोजन केले जाते. युवा स्वाभिमान, मनसे, शिवसेनेद्वारे (शिंदे गट) तीन मोठ्या दहिहंडीचे आयोजन होत असते. यानिमित्त शहरात सिने अभिनेते, पुढाऱ्यांचे आगमन होत असते. दहिहंडीच्या निमित्ताने शहरात उत्साहाला उधाण येते. तसेच दर श्रावण सोमवारी कावड यात्रेचेही मोठे वाजत गाजत शिवालयांमध्ये आगमन होत असते. कावड यात्रेतील देखावे बघण्यासाठी भाविकांची शिवालयांसह रस्त्यांवरही चांगलीच गर्दी होत असते.