मुंबई : तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यांच्या 'आवाज मराठीचा' मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीय. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येणार का? राज ठाकरे यांचं युतीबाबतचं मौन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करतंय. यामुळे चर्चांना उधाण आलंय...
महाभारतामध्ये पांडवांनी केवळ पाच गावं मागितली होती… धर्म, संयम आणि टोकाचा संयम दाखवत पांडवांनी युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला… पण कौरव म्हणाले – ‘सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन देणार नाही!’ आणि मग युद्ध अटळ झालं… शिवसेनेत असतानाचा राज ठाकरे यांचा प्रसंगही काहीसा असाच… “मला फक्त नाशिक आणि पुण्याची जबाबदारी द्या… पण निर्णय घेताना ढवळाढवळ नको,” अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. पण त्यांची ही भूमिका झिडकारली गेली… अखेर गटबाजी, दुर्लक्ष, आणि अपमान या सगळ्याला कंटाळून माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. त्या निर्णयानंतरही त्यांचं मन मात्र मराठी माणसांकडेच घुटमळत होतं… मराठी माणसाच्या हितासाठी त्यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचा संदेश दिला.. पण त्या दोन्ही वेळा उत्तर आलं – "नकार" त्यानंतर शिवसेनेने राज ठाकरेंच्या मनसेचे नगरसेवक फोडले… ते ही त्यांचा मुलगा आजारी असताना… पुढे, सत्तेसाठी उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या मांडीवर बसले आणि काँग्रेससोबत आघाडी केली… आणि त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. आता उद्धव ठाकरे गट नामषेश होण्याच्या मार्गांवर आहे. पण ‘मराठी भाषा’ या मुद्द्यासाठी राज आणि उद्धव एकाच व्यासपीठावर आले…
पाच जुलै रोजी वरळी येथील एनएससीआय डोममध्ये ठाकरे गट आणि मनसे यांनी 'आवाज मराठीचा' मेळावा आयोजित केला. हा मेळावा प्राथमिक शाळांमध्ये त्रिभाषिक धोरण लागू करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधातील यशस्वी आंदोलनाचा उत्सव साजरा करण्यासाठी होता. 'आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहू. आम्ही मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवू,' असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत उत्साह दाखवला असला, तरी राज ठाकरे यांनी युतीच्या मुद्द्यावर मौन बाळगलंय. तसेच आपल्या नेत्यांना युतीबाबत काहीही बोलू नका असे स्पष्ट बजावले आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज यांच्या या थंड प्रतिसादाबाबत नाराजी व्यक्त केलीय. भूतकाळातील कटू अनुभव आणि जागावाटपाचा मुद्दा युतीच्या मार्गात अडथळा ठरू शकतो, अशीही चर्चा आहे.
त्यातच आता जेव्हा ठाकरे गट डबघाईला आलाय… तेव्हा राज ठाकरे हे त्यावेळी झालेला अपमान, दुर्लक्ष आणि फसवणुकीचे सगळे घोट घेऊन पुन्हा एकत्र येतील का? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.