पूर्णिया : बिहारच्या पूर्णिया येथे एकाच कुटुंबातील ५ जणांची जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. अंधश्रद्धेतून स्थानिक रानीपतारा तेटगामा गावात हे हत्याकांड घडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे मारेकऱ्यांनी हत्येनंतर पाचही मृतदेह गायब केले होते.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णियाच्या रानीपतारा तेटगामा गावात काही महिन्यांपूर्वी ४ ते ५ बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गावातील सीतादेवी या महिलेवर जादू-टोण्याचा संशय होता. त्यामुळे हल्लेखोरांना रविवारी मध्यरात्रीनंतर ३ वाजता सदर महिलेच्या कुटुंबावर हल्ला चढवला. सीतादेवीसह कुटुंबातील ५ जणांना घरातून ओढत एका तलावाजवळ आणले. त्यांना अमानुषरित्या मारहाण करत अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले.
या दुर्दैवी घटनेतून कुटुंबातील १६ वर्षाचा सोनू कुमार हा मुलगा सुदैवाने वाचला. त्याने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मुलाने सांगितलेल्या घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले.
याप्रकरणी ४ आरोपींची नावे उघड झाली असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत गावातील अनेक लोकांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.