मुंबई: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यावसायिकांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून आज मराठी मोर्चा काढला आला. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे मोर्चा सुरू होण्याआधीच मनसेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडून करण्यात आलेल्या धरपकड कारवाईवर संताप व्यक्त करत शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी झाले. पण, मोर्चाच्या ठिकाणी येताच मोर्चेकरांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर पाण्याची बॉटल फेकून मारण्यात आली.
प्रताप सरनाईक यांनी मोर्चात सहभागी होण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याविरोधात मनसैनिकांनी घोषणा देत त्यांना मोर्चातून बाहेर काढले. दरम्यान त्यांच्यावर गर्दीतून एक बाटली देखील भिरकावण्यात आली. आंदोलकांचा रोष पाहता प्रताप सरनाईक यांनी मोर्चातून माघारी परतावे लागले. पण या घटनेनंतर सरनाईकांनी मनसे कार्यकर्त्यांवर टीका केली.
प्रताप सरनाईकांसोबत काय घडले?
मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांना अटक करण्याचे आव्हान देत मोर्चात सहभाग घेतला होता. पण, मोर्चाच्या ठिकाणी पोहोचताच प्रताप सरनाईक यांच्याविरोधात काही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक गो बॅक, जय गुजरात अशा घोषणा आंदोलकांनी सरनाईकांविरोधात दिल्या. मराठा एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना घेऊन सरनाईक मोर्चात सहभागी झाले. त्यावेळी घोषणाबाजी करत एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने पाण्याची बॉटल फेकून मारली. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी त्यांना तातडीने गर्दीतून बाहेर नेले. त्यानंतर ते परत निघून गेले.
प्रताप सरनाईकांची मोर्चेकरांवर टीका
इथे मी मराठी बांधवांना आणि मराठी अस्मितेला समर्थन देण्यासाठी मोर्चात सहभागी होण्यास आलो होतो. मराठी एकीकरणाचा समितीचा हा मोर्चा होता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेने यावर राजकारण केले, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे. "ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना राजकारण करू द्या. पंरतु, बाहेरची लोक शहरात येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने बेकायदेशीरित्या पोलिसांनी कुणाला अटक केली असेल, तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही. हे उबाठा आणि मनसेचे राजकारण चालूच राहणार आहे. पण, शेवटी प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी लोकांसाठी आहे, हे सिद्ध झाले आहे", असे प्रताप सरनाईक म्हणाले.