मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्याची सुरुवात आदिवासींच्या राखीव नोकऱ्या आणि उर्दू अकादमीशी संबंधित विषयाच्या चर्चेने झाली. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत उर्दू अकादमीचा मुद्दा हिरिरीने मांडला. उर्दू ही हिंदी सिनेविश्वाचा आधार असल्याचे वक्तव्य आमदार रई शेख यांनी केले. लता मंगेशकर यांच्यासह हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी उर्दू भाषेचा अभ्यास केला आहे असेही ते म्हणाले. जी उर्दू भाषा बॉलिवूडचा आधार आहे त्याच उर्दू भाषेच्या अकादमीला सरकारकडून कार्यालयासाठी जागा मिळू नये ही दुर्दैवी बाब असल्याचे आमदार रईस शेख म्हणाले. उर्दू धर्माची नाही तर प्रेमाची भाषा आहे, असेही वक्तव्य आमदार रईस शेख यांनी केले.
शासनाने मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालयात उर्दू अकादमीला छोटेखानी जागा दिली आहे. ही जागा पण आता सरकारने अकादमीकडून परत ताब्यात घेण्याची तयारी सुरू केल्याचा दावा आमदार रईस शेख यांनी केला. उर्दू अकादमीसाठी राज्य शासनाने एक जागा द्यावी अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली.
मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि अमराठी यांच्यात भाषावाद भडकावण्याचे प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी नोकरदार, व्यावसायिक यांच्यावर दबाव टकून त्यांना मराठीतून संवाद साधण्याची सक्ती करण्याचे प्रकार सुरू आहेत. मराठी न बोलणाऱ्यांना मारझोड करण्याचे प्रकार घडले आहेत. राज्य शासनाने या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्यांकरवी मराठी - अमराठी वादात कायदा हाती घेणे योग्य नाही, असे जाहीररित्या सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर उर्दू संदर्भात विधानसभेत चर्चा झाली.
सरकारने उर्दू अकादमीसाठी मुंबईतच जागा द्यावी, अशी आग्रहवजा मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. बॉलिवूडचा आधार उर्दूच असल्याचा दावा आमदार रईस शेख यांनी केला आहे.