शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यात २३ ठिकाणी पूर, १९ ठिकाणी ढगफुटी आणि १६ भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. मान्सून सुरू झाल्यापासून ७८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी ५० जणांचा मृत्यू पावसाशी संबंधित घटनांमुळे झाला आहे. तर मंडी जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
हिमाचल प्रदेशात२ राष्ट्रीय महामार्गांसह २४३ रस्ते बंद आहेत. आणि २७८ वीज ट्रान्सफॉर्मर काम करत नाहीत. २६१ जल प्रकल्प बंद आहेत. पुरामुळे नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे हवामान खात्याने सिरमौर, कांगडा आणि मंडी या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तर शिमला, सोलन, हमीरपूर, बिलासपूर, उना, कुल्लू आणि चंबा या ७ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. ज्यामुळे पूर आणि इतर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना अनावश्यकपणे नद्या आणि ओढ्यांजवळ जाऊ नका आणि प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. पण सामान्य जनतेची सतर्कताही अत्यंत महत्वाची आहे.