सोलापूर : पंढरपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्यात काही मिनिटे संवाद झाला. या भेटीची सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली असून त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपाच्या वाटेवर चालले असल्याची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली आहे.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार माने आणि सुरेश हसापुरे यांच्याशी हातमिळवणी करून पॅनेल उभे केले होते. या निवडणुकीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांनी कल्याणशेट्टींना दिल्याचे त्यावेळी सांगितले गेले. पण, जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ आमदार नाराज झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हे पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपूरला गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दोन्ही देशमुख हजर होते.