Tuesday, July 8, 2025

फ्री फायर च्या नादात शेतकऱ्याच्या मुलाने उडवले ५ लाख

फ्री फायर च्या नादात शेतकऱ्याच्या मुलाने उडवले ५ लाख

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी सात लाख रुपये साठवले होते. पण मुलाने ऑनलाईन गेमच्या नादात पाच लाख रुपये गमावल्याची घटना राधानगरी तालुक्यात घडली आहे .


आजकाल लहान मुलांमध्ये मोबाइल वर गेम खेळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे . पालक देखील याकडे दुर्लक्ष करत असतात . याउलट मुले त्रास देऊ लागले की, पालक मुलांना मोबाइल देऊन शांत करतात . परंतु हे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आला आहे . कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी ७ लाख रुपये बँक खात्यात साठवले होते. पण सहावीत शिकणाऱ्या त्याच्या मुलाने मोबाइलवर 'फ्री फायर' गेम खेळताना काही अ‍ॅप घेतले. त्यानंतर काही क्षणात बँक खात्यातील पाच लाखांची रक्कम गायब झाली .


संबंधित शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पैसे गोळा करत होता . म्हशी घेण्यासाठी हे पैसे तो साठवत होता . आपल्या बँक खात्यात किती पैसे गोळा झाले याची माहिती घेण्यासाठी बँकेत गेला असता, बँकेतील स्टेटमेंट तपासल्यानंतर त्याला धक्काच बसला. खात्यावर केवळ दोन लाख रुपये उरले असल्याच बँक स्टेटमेंटमध्ये दिसत होते. बँकेकडे अधिक चौकशी केली असता बँकेने पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्याने त्वरित सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी देखील वेगाने तपास करत बँक खात्यातील ट्रांजेक्शन तपासले. तसेच शेतकऱ्याचा मोबाईल देखील तपासला. यावेळी काही रक्कम फ्री फायर गेममध्ये अ‍ॅप घेण्यासाठी यूपीआय पद्धतीने ट्रांजेक्शन केल्याच समोर आलं .


पोलिसांनी अधिक तपास केला असता वडिलांच्या ज्या मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे सारखे यूपीआय अ‍ॅप आहे, त्या मोबाईलमध्ये "फ्री फायर" गेम खेळत असताना नकळत ट्रांजेक्शन केल्याचे समोर आले. सायबर हॅकरने अकाउंट हॅक करून आणखी पैसे घेतल्याचे देखील समोर आले असून याचा फटका या गरीब शेतकऱ्याला बसला आहे.


नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते. परंतु मुलाने गेम च्या नादात पैसे उडवल्याने या शेतकऱ्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे .

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा