नागपूर : उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आज (सोमवार, ७ जुलै) रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेसची स्थिती फार वाईट
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला नेहमीच अपमानित केले आहे. त्यामुळे अजून किती अपमानित व्हायचे ते काँग्रेस पक्षाने ठरवायचे आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतू, उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. उद्धवजींनी जिद्द करून काँग्रेसच्या जागा घेतल्या आणि काँग्रेसला कमी केले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगावर आला. ठाकरे सरकारची अँटी इनकंबन्सी काँग्रेसवर आली. त्यावेळी काँग्रेसचे नेते हतबल होते. त्यामुळे आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे," असे ते म्हणाले.