सस्पेंशन

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


आपण सर्वच दानधर्म करतो; परंतु आपले दानधर्म हे खूपदा उघड असते म्हणजे आपण काहीतरी देतोय, हे घेणाऱ्याला कळते. हॉटेलमधून एखादा पदार्थ आपण मुद्दाम विकत घेऊन रस्त्यावरच्या गरीब माणसाला किंवा भिकाऱ्याला हातात देतो. तेव्हा तो पदार्थ आपल्याला कोणी दिलाय, हे घेणाऱ्याला कळतेच ना! खूपदा शैक्षणिक, सामाजिक, धर्मदाय इ. संस्थांमधून दानधर्माच्या रकमेची आपल्याला पावतीही मिळते. ती पावती आपण जपून ठेवतो. कारण त्या दानधर्माच्या पावतीवर आपल्याला ‘इन्कम टॅक्स’मध्ये सवलत मिळते.


‘सरंक्षण निधी’, ‘धर्मादाय सामाजिक संस्था’, ‘शैक्षणिक आणि संशोधन संस्था’ यांना मदत करणे हे व्यक्तीचे समाजभान जागृत असल्याचे लक्षण आहे, असे मानले जाते आणि म्हणूनच या सामाजिक जाणिवेला आयकर प्रणाली प्रोत्साहन देत असून अशा संघटना, संस्था यांना दिलेल्या देणगीस आयकर कायद्यातील कलम ८० जी आणि ८० जीजीए नुसार काही सवलती देण्यात आल्या आहेत. या सरकारी नियमामुळे काही माणसे नियमितपणे दानधर्म करतात आणि कर सवलत मिळवतात, ही खरंच चांगली गोष्ट आहे.


‘युरोप’ दौऱ्याला जाण्याआधी महाजालावर युरोपची माहिती शोधत होते तेव्हा तिथे ‘नार्वे’ या देशात एक वेगळ्याच प्रकारचे समाजकार्य दिसून आले. तिथे हॉटेलमध्ये जाणारा माणूस आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून भुकेल्यांसाठी दान देऊ इच्छितो. या देशात दानधर्म करत असताना त्या माणसांना आपले दान नेमके कोणापर्यंत पोहोचले आहे हे जाणून घ्यायचे नसते. त्यामुळे दान देऊन ते निघून जातात आणि दान घेणाऱ्यालाही फार अवघड (Awkward) वाटत नाही. तर ते कसे साध्य होते, हे जाणून घेऊया. तिथे माणसे जेव्हा हॉटेलमध्ये जातात मग खाण्यासाठी असो वा पार्सल घेण्यासाठी तेव्हा ते ऑर्डर देताना, ‘दोन पिझ्झा, दोन सस्पेन्शन (Suspension)’ किंवा ‘दोन बर्गर, एक सस्पेन्शन.’ असे सांगतात. खरं तर ‘सस्पेन्शन’ शब्दाचा अर्थ आहे निलंबन किंवा स्थगिती. मग हा शब्द ‘नार्वे’तील माणसे कशासाठी वापरतात बरे? तर तिकडे आपण जेवणाच्या पदार्थांची जी ऑर्डर दिली असते त्या ऑर्डरच्या एक, दोन किंवा आणखी कितीही भागाचे पैसे आपण आपल्याच ऑर्डरसोबत अधिकचे द्यायचे आणि तिथून आपले पार्सल घेऊन निघून जायचे. मग एखादा गरजू तसेच गरीब माणूस तिथे येतो आणि विचारतो की एक बर्गर किंवा एक पिझ्झा किंवा कॉफी सस्पेन्शनमध्ये आहे का? जर त्यांच्याकडे ते पदार्थ सस्पेन्शनमध्ये असतील तर त्या माणसाला ते फुकट दिले जातात.


एकंदरीतच काय तर सर्व देशात, धर्मांत, जातीत दान देण्याची पद्धत आहे. ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. फार दूर जाण्याची गरज नाही. मी माझ्या अत्यंत जवळच्या माणसाचे उदाहरण देते. माझे सासरे इंजिनीयरचे शिक्षण घेत असताना ‘वारा’वर जेवायला जायचे. म्हणजे आठवडाभर प्रत्येक वाराच्या दिवशी एका नवीन घरी जेवायला जायचे. बऱ्या परिस्थितीची माणसे अशा तऱ्हेने शिकणाऱ्या मुलांना, आपल्या मुलाबाळांसोबत बसवून जेवू घालायचे. ते त्यांच्या परिस्थितीनुसार आणि सोयीनुसार एकूण विद्यार्थी किंवा वार ठरवायचे! त्यांना अत्यंत प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक अन्नदान करायचे! अशी अनेक माणसे माझ्या ओळखीची आहेत की जे ‘वारा’वर जेवून आज समाजात मोठ्या मोठ्या पदावर आहेत. त्यांना नक्कीच दान मिळालेल्या त्या अन्नाचे महत्त्व आहेच आणि म्हणून तीच भावना मनात जागृत ठेवून ते नियमित अन्नदान करतात, हेही मी पाहिलेले आहे. आता अगदी ‘वारा’वार कोणाला जेवू घालणे शक्य होत नाही; परंतु या विद्यार्थ्यांचा शाळा, कॉलेजचा, हॉस्टेलचा, जेवनाचा खर्च मात्र ते करतात. असे म्हटले जाते की, आपण जेव्हा दान करतो तेव्हा एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये; परंतु अनेक जण आपण दान दिले याविषयी बढाया मारताना दिसतात. असो.


परवा एका सांस्कृतिक कार्यक्रमाला गेले होते. सगळे निमंत्रित होते. तरीही एका रांगेतून ते पुढे जाताना दिसले. मीही त्या रांगेत उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितले की, अलीकडेच शाळा सुरू झालेल्या आहेत आणि गरीब विद्यार्थ्यांना आम्ही वह्या आणि पेन पोहोचवतो.


आपली इच्छा असेल तर पन्नास रुपये देऊन एक वही आणि पेन आमच्याकडून विकत घेऊन किंवा हवे तर बाहेरून विकत आणून तुम्ही देऊ शकता! मला मनापासून ही संकल्पना आवडली. आपण आपल्या हाताने वही आणि पेन दान देऊ शकलो, याबद्दल समाधान वाटले. ही वही आणि पेन शोधण्याचे आपल्याला कष्ट नकोत म्हणून त्यांनीच काही वह्या आणि पेन विकत आणून ठेवले होते, या कल्पनेचे मात्र कौतुक वाटले!


अशा छोट्या दानाला कधीच कोणी ‘नाही’ म्हणत नाही; परंतु ते कसे, कोणत्या प्रसंगात, कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसांकडून मिळवता येईल यासाठी कल्पकतेची गरज आहे, हे मात्र निश्चितपणे त्या दिवशी लक्षात आले.


भारतीयसुद्धा खूप दानशूर आहेत. त्यामुळे आपल्याकडेही नॉर्वेसारखी ‘सस्पेन्शन’ची कल्पना सहज रुजू होऊ शकते. फक्त कोणीतरी ती चालू करण्याची मात्र गरज आहे! हॉटेलवाल्यांवर या सस्पेन्शनचा वेगळा हिशोब ठेवण्याची अतिरिक्त जबाबदारी येऊन पडेल, हे मात्र निश्चितच!

Comments
Add Comment

धास्ती चीनच्या नौदलाची

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव चीनच्या नौदलाची ताकद अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून जहाज

ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते नाना पाटेकर 

कोकणी बाणा : सतीश पाटणकर तगडा अभिनय, जबरदस्त संवादफेक, समोरच्याला आपल्या डोळ्यांनीच घायाळ करणारे व्यक्तिमत्त्व

मानव-सर्पातील वाढता संघर्ष

हवामानबदलामुळे विषारी सापांच्या नैसर्गिक अधिवासात बदल होत असून मानव-साप संघर्षाचा धोका वाढू शकतो. एका

और क्या जुर्म है, पता ही नहीं !

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे चिंतनशील मनांना कधीकधी अगदी मूलभूत प्रश्न पडत असतात. ज्यांना नशिबाने कोणतेच

मैत्रीण नको आईच होऊया !

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू मागील लेखात मैत्रीण नको आईच होऊया याबद्दल आपण काही ऊहापोह केला होता, मात्र

भुरिश्रवा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे माहाभारत युद्ध हे कौरव-पांडवांमध्ये लढले गेले. कौरव-पांडवांमधील प्रमुख