
ओंजळ : पल्लवी अष्टेकर
आजच्या जागतिकीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जितके एकमेकांशी जोडलेले आहोत, तितकेच आपण एका जुन्या मानवी प्रवृत्तीच्या अधिक गुंतागुंतीत अडकलेलो आहोत. तुलना... पूर्वी ही तुलना आपल्याच शेजारी, मित्रांमध्ये किंवा नातलगांमध्ये मर्यादित होती.
आज मात्र ती जगभर पसरलेली आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची विदेशातील सहल, एखाद्या उद्योजकाचे यश किंवा एखाद्या किशोरवयीन तरुणाचा स्टार्टअप - हे सर्व आता आपल्या दररोजच्या आयुष्याचा भाग झाले आहेत.
सौरभ नेहमी स्वतःच्या विषयी उदास व खिन्न असायचा. खरं तर त्याच्या कंपनीत तो चांगल्या हुद्द्यावर होता; परंतु त्याचे म्हणणे होते की, ‘‘मी एवढे कष्ट घेतो, पण माझी पदोन्नती होत नाही. इतरांची होते.” अशी सततची तुलना इतरांशी करणे हे नकारात्मक तुलनेचे उदाहरण आहे. अशी तुलना आत्मसंतोष नष्ट करून जळजळीत भावना निर्माण करू शकते.
तुलना ही मानवी स्वभावाची अंगभूत बाब आहे. प्राचीन काळी आपली सामाजिक जागा समजून घेण्यासाठी ही उपयुक्त होती. पण आज हीच तुलना अनेकदा असमाधान, न्यूनगंड आणि मानसिक तणाव निर्माण करते.
एका सामान्य तरुणाचं उदाहरण घ्या. तो सोशल मीडियावर स्क्रोल करत असतो आणि त्याच्यासमोर येतात - विलासी सहली, यशस्वी करिअर, परिपूर्ण शरीरयष्टी. अशा “परिपूर्ण” जीवनाच्या प्रतिमा पाहून तो एकच विचार करतो: “मी पुरेसा नाही.” संशोधन असे सांगते की, सोशल मीडियाचा जास्त वापर हे नैराश्य, चिंता आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेशी संबंधित आहे.
आई-वडील संतोषला सांगतात, “तुझा मित्र आशुतोष पहिल्या नंबरवर आहे आणि तू मात्र मध्यम गुणांमध्ये आहेस. “अशा प्रकारची तुलना मुलांमध्ये न्युनगंड निर्माण करू शकते. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते.त्यामुळे अशी तुलना मुलांना अन्यायकारक वाटू शकते.
तथापि, तुलना ही केवळ नकारात्मक असते असे नाही. जर ती योग्य प्रकारे वापरली गेली, तर ती सकारात्मक प्रेरणा देऊ शकते. मानसशास्त्रात दोन प्रकारच्या तुलना सांगितल्या जातात. वरच्या आणि खालच्या तुलना. वरची तुलना म्हणजे अशा लोकांशी तुलना करणं जे आपल्याहून अधिक यशस्वी वाटतात. ही तुलना प्रेरणा देऊ शकते, तर खालची तुलना म्हणजे अशा लोकांशी तुलना जी आपल्याहून कमी यशस्वी वाटतात, त्यामुळे कधी -कधी समाधान मिळू शकते.
तुलना ही टाकता येत नाही. पण तिचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी करायचा की दुःखासाठी हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, कौशल्ये व ध्येय वेगळी असतात. खरे आत्मविश्वासाचे साधन म्हणून स्वत:ची तुलना स्वतःशी करणे रास्त आहे.
पण जेव्हा तुलना ही सतत आणि आंतरिक बनते, तेव्हा ती घातक ठरते. आपण स्वतःचा प्रवास न पाहता, इतरांच्या मापाने स्वतःला मोजू लागतो आणि हे माप अनेकदा त्यांच्या एखाद्या बाजूवर आधारित असते, त्यांच्या खऱ्या परिस्थितीवर नाही.
सकारात्मक तुलना प्रेरणादायी ठरू शकते. मेधा आपल्या मैत्रिणीला स्नेहाला म्हणाली, ‘‘तुझे व्यक्तिमत्त्व माणसांना जोडणारे आहे. त्यामुळे तुझ्या संकट काळातही माणसे तुझ्या मदतीला येतात. मी देखील असं करायला हवं.”
कार्यक्षेत्रातही तुलना मोठ्या प्रमाणात दिसून येते. लोकांनी स्वतःच्या प्रगतीपेक्षा इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःला मोजण्याची सवय लावून घेतली आहे. यामुळे सहकार्याची संस्कृती कमी होते आणि स्पर्धात्मकता वाढते. परिणामी, कामाचा ताण, आत्मविश्वासाचा अभाव अशा बाबी घडून येतात.
या उलट, जे समाज आणि संस्था सहकार्याला प्राधान्य देतात, ते अधिक यशस्वी ठरतात. स्कँडिनेव्हियन देश हे सहकार्याच्या मूल्यांवर आधारित आहेत आणि जगात सर्वाधिक समाधानी देश म्हणून ओळखले जातात. काही नामांकित कंपन्याही स्पर्धेऐवजी सहकार्याला महत्त्व देतात, ज्यामुळे कर्मचारी अधिक प्रभावीपणे कार्य करतात.
तत्त्वज्ञानातही तुलना या विषयावर अनेक विचार व्यक्त झाले आहेत. स्टॉइक तत्त्वज्ञानी म्हणतात की, ‘‘आपण फक्त आपल्या नियंत्रणातील गोष्टींवर लक्ष द्यावं.” लाओ त्झू यांनी अहंकाराने इतरांशी तुलना करू नये असा सल्ला दिला. आधुनिक अध्यात्मिक विचारांमध्येही हेच सांगितले जाते. तुलना आनंदाचा शत्रू आहे.
मग आपण काय करू शकतो?
एक उपाय म्हणजे स्व-तुलना. म्हणजेच, आपण काल जिथे होतो तिथून आज किती पुढे आलो आहोत हे पाहणे. “मी त्यांच्यासारखा का नाही?” या प्रश्नाऐवजी “मी माझ्याच मागील आवृत्तीपेक्षा आज किती सुधारलो आहे?” हा विचार केला पाहिजे. ही छोटीशी मानसिकता, बदल आपलं जीवन सकारात्मकरीत्या बदलू शकते.
दुसरा प्रभावी उपाय म्हणजे कृतज्ञता. जे आहे त्यासाठी आभार मानणं. कृतज्ञता आपल्याला आपल्या वास्तवात ठेवते. ती आपल्या दृष्टिकोनात भर घालते आणि तुलना करण्याची गरज कमी करते.
शाळांमध्ये मुलांच्या विविध क्षमतांना मान्यता दिली पाहिजे, कंपन्यांनी सहकार्याचे वातावरण तयार केले पाहिजे आणि आपण सर्वांनी स्वतःच्या आयुष्याचा विचार करून समाधान शोधलं पाहिजे.
तरीही, हे सगळं करणे सोपे नाही. आपल्याला सतत इतरांच्या यशाची झलक दाखवली जाते. जाहिरात कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म याचा फायदा घेतात. आपल्या आत्मविश्वासाला ढवळून काढत, ते आपल्याला हे पटवून देतात की, “तुमचं काहीतरी कमी आहे.”पण एकदा आपण हे लक्षात घेतलं की, तुलना आपल्यावर कशी प्रभाव टाकते, तेव्हा आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. आपण सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवू शकतो, आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकतो आणि यशाचे अर्थ पुन्हा ठरवू शकतो. तुलना ही मुळात वाईट नाही. ती एक साधन आहे-ज्याचा उपयोग आपण स्वतःला उन्नत करण्यासाठी करू शकतो, पण जर ती आपल्या आत्ममूल्याचा आधार बनली, तर ती आपली शांतता हिरावून घेते.या आरशांच्या युगात, आपण स्वतःकडे बघायला विसरू नये. कारण खरी ओळख तीच असते जी इतरांशी तुलना न करता, स्वतःच्या मूल्यांवर आधारलेली असते.