Friday, July 4, 2025

जाईन गे माये तया पंढरपुरा

जाईन गे माये तया पंढरपुरा

चारुदत्त आफळे : ज्येष्ठ निरूपणकार


आषाढी एकादशी ही विठ्ठलभक्तांसाठी पर्वणी. विठ्ठल ‘लोकदेव’ आहे. तो सर्वांना स्वीकारणारा आणि सर्वांनी स्वीकारलेला असा आहे. विठ्ठल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. कारण संतांनी आईच्या रूपात त्याचे स्वरूप आपल्यासमोर मांडले आहे. देव, वडील वा गुरुंना समजून घेण्यास विद्वत्तेची, योग्यतेची गरज असते. मात्र आईजवळ जाण्यासाठी अपार प्रेम एवढीच गोष्ट पुरेशी असते. आज त्याचीच प्रचिती येते.


भाविकांसाठी आषाढी एकादशीचा दिवस पर्वणीपेक्षा कमी नाही. वारीची मोठी परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या दिवसाचे मोठे महत्त्व आहे. आपल्याकडे वारीची परंपरा हजार वर्षांपासून दिसते. कारण आपले वडीलदेखील वारीला जात होते आणि त्यांनीच आपल्याला वारीच्या सोहळ्यात समाविष्ट करून विठ्ठलभक्तीच्या परंपरेमध्ये सामावून घेतले, असा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथांच्या अभंगांमध्ये आढळतो.

महाराष्ट्राचा प्राप्त इतिहास ज्ञानेश्वरांपासूनच लक्षात घेतला जात असल्याचे मानले, तर लक्षात येते की, वारीची परंपरा खूप जुनी आहे. नामदेवांच्या घरातही वारी आहे आणि तुकोबांच्या घरी तर आहेच आहे. तेव्हा सगळ्या संतांच्या जीवनात वारीचा उत्सव दिसतो. अर्थात तेव्हाची वारी कशी होती, किती मोठी होती याबाबत फारशी माहिती मिळत नाही, पण अनेक लोक आषाढी-कार्तिकीला पंढरीला जात होते हे नक्की. वारीचे आत्ताचे रूप तुकोबांचे चिरंजीव नारायण महाराजांपासून दिसू लागले, असे म्हटले जाते. त्याचे काही ठळक उल्लेख इतिहासात मिळतात. नारायण महाराजांनी तुकोबा आणि ज्ञानेश्वरांच्या पादुका एकत्र घेऊन वारीचा दंडक सुरू ठेवला.


वारी एकाच मार्गाने जात असल्यामुळे बरेच लोक सोहळ्याच्या सेवेपासून वंचित राहत होते. ही अडचण लक्षात घेऊन पुढे दोन मार्ग करण्यात आले आणि ज्ञानदेव आणि तुकोबांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरला पोहोचू लागल्या. अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणे, हाच यामागचा हेतू होता. आजही महाराष्ट्रातील ४० ते ५० क्षेत्रांमधील दिंड्या एकत्र येतात आणि परंपरेचे पालन करत सोहळा पार पडतो. विठ्ठल हा ‘लोकदेव’ आहे. तो सर्वांना स्वीकारणारा आणि सर्वांनी स्वीकारलेला असा आहे. विठ्ठल घराघरांमध्ये पोहोचलेला आहे. याचे कारण संतांनी आईच्या रूपात त्याचे स्वरुप आपल्यासमोर मांडले आहे. देव, वडील वा गुरूंना समजून घेण्यास विद्वत्तेची, योग्यतेची गरज असते. मात्र आईजवळ जाण्यासाठी अपार प्रेम एवढीच गोष्ट पुरेशी असते. या नात्याने विठ्ठलाशी बांधले गेल्यामुळे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला. गाणपत्य म्हणजे फक्त गणपतीची उपासना करणारे चिंतामणी देवदेखील वारीला येऊ लागले आणि शाक्त म्हणजे फक्त देवीची उपासना करणारेही वारीला आले. अशा प्रकारे दत्तभक्त, महानुभावही यात आले. संतांनी वारीमध्ये आल्यास स्वागतच आहे, हा विचार या सगळ्या पंथापर्यंत पोहोचवला आणि त्यांनीही विठ्ठलाच्या वारीला जात असल्याचा अभिमान बाळगला. अशा तऱ्हेने विठ्ठलाची माऊली अर्थात ‘विठाई माऊली’ झाली.


पूर्वपीठिका अशीच सांगितली जाते की, पुंडलिक नावाचा ऋषी पंढरपुरामध्ये तपश्चर्या करत होता. त्याला भेटण्यासाठी गोपालकृष्ण तिथे आले, पण आम्ही तुझी तपश्चर्या करायची आणि मग तू इथे येऊन दर्शन द्यायचे असे न करता तू कायमस्वरुपी इथे राहा, म्हणजे आम्हाला तुला केव्हाही भेटता येईल, असा आग्रह पुंडलिकाने धरला आणि देवाने त्याचा स्वीकारही केला. या कथेनुसारही पुंडलिकाने देवाला मित्र, सखा केल्याचे दिसते. भाविकांना तो अगदी जवळचा वाटण्यामागे हेदेखील एक कारण म्हणता येईल. अन्य देवतांच्या रूपाबद्दल अशा स्वरुपाची भावना जाणवत नाही. त्यांच्याकडे अजूनही गुरूंच्या रुपातच पाहिले जाते. त्याबद्दल एक प्रकारचा धाक जाणवतो. मात्र इथे सगळेजण विठ्ठलाशी येऊन भांडतात, उराउरी भेटतात, त्याला लेकुरवाळा करतात. आईपाशी असतो तोच मोकळेपणा त्यांना त्याच्या ठायी जाणवतो. वारीचे रूपही असेच देखणे आहे.


ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, खरे तर मुलाला नटण्यात काहीही रस नसतो, पण तरीही आई त्याला नटवते कारण, तिला आपली मुले तशी बघण्यातच सुख असते. आमची विठाई माऊली तशीच आहे. ती आम्हाला भक्तीप्रेमाने नटवते आणि भेटण्यासाठी, पाहण्यासाठी जवळ बोलावते. वारीच्या सोहळ्याला ज्ञानदेवांनी दिलेले हे रूप किती देखणे आहे पाहा. थोडक्यात, आईचे गोड रूप घेतल्यामुळे हा लोकदेव जनसामान्यांपर्यंत पोहोचलेला दिसतो. वारीत शिस्त आहे, परंपरेचे पालन आहे तसेच अत्यंत साधेपणाही आहे. या निमित्ताने समाज एकत्र येतो. एकमेकांमध्ये मिसळून जातो. खरे तर हा एक संस्कार सोहळा आहे, असेच म्हणता येईल. भाविक सर्व असुविधांचा स्वीकार करून आपल्या भक्तीचे, प्रेमाचे प्रगटीकरण करतात. भगवंताच्या उपासनेत रममाण होतात. तसे बघायला गेले, तर वारीतील उपासना खूप कडक असते. नियम काटेकोरपणे पाळले जातात. ठरावीक वेळी आरती, कीर्तने होतात. उपासनेची ही कठोरता पाळताना प्रत्येक वारकरी सुविधेकडे लक्ष न देता ईश्वरावरील भक्तीला प्रथम स्थान देतो. वारीच्या निमित्ताने याचा संस्कार आणि सराव होतो. वारीबद्दल ज्ञानेश्वरांचा एक वेगळा विचारही लक्षात घेण्याजोगा आहे. ‘अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक’ असे ते म्हणतात. इथे आईने म्हणजेच विठ्ठलाने मला सासरी सुखाचा संसार करायला पाठवले आहे, असे ते सांगतात आणि तो किती सुखाचा केला हे सांगण्यास दरवर्षी मी तिच्याकडे जातो, असे स्पष्ट करतात.


जाईन गे माये तया पंढरपुरा,भेटेन माहेरा आपुलिया...
म्हणजेच वर्षभरात कोणते चांगले काम केले, कितीजणांना सन्मार्गी लावले, कितीजणांना संस्कारी केले, सजग केले हे सांगण्यास मी पंढरीला जातो. विठ्ठलाला याबाबत सांगणे ही माझी जबाबदारी आहे, असे ते स्पष्ट करतात. ज्ञानदेवांनी वारीला इतके गोड रूप दिले आहे. ईश्वरभक्तांची मांदियाळी करून दाखवण्याचे विठ्ठलाने दिलेले काम त्यांनी स्वीकारले. एक प्रकारे त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी ते दरवर्षी पंढरीत जातात. वारीचा अशा किती तरी सुंदर पद्धतीने आणि वेगवेगळ्या आयामांनी विचार केला आहे, हेच अशा उदाहरणांमधून समोर येते. समाजामध्ये निकोप वातावरण निर्माण करण्यासाठी अशा विचारांचा फार मोठा उपयोग झाला आणि यापुढेही करून घेता येईल.


जातीपातीचा, कर्मकांडाचा विचार न करता विठ्ठलभक्तीसाठी एकत्र येण्याचा संस्कार वारीने आपल्याला दिला आहे. म्हणूनच ही संस्काराची वारी आहे. इथे प्रत्येकजण एकमेकांना ‘माऊली’ म्हणूनच हाक मारतो. विठाई माऊली आणि ज्ञानेश्वर हीदेखील माऊलीच...असे म्हणताना तुकोबांनी वारीमुळे भाविकांची, वारकऱ्यांची चित्ते लोण्यासारखे मऊ व्हावीत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. असे झाले तर आपण एवढे कठोर का राहिलो, असे वाटून तिथल्या दगडांनाही पाझर फुटल्याखेरीज राहणार नाही, अशी भावना ते व्यक्त करतात. वारी अशीच आहे. वाळवंटात खेळ रंगताना, सावळ्या रूपाचे दर्शन घेताना, कळसाला नमस्कार करून माघारी फिरताना प्रत्येकाच्या मनात संमिश्र भावनांचा कोळ असतो आणि पुढल्या वर्षी इथेच भेटण्याची आस असते. आजचा दिवसही त्यातील एक...(शब्दांकन : स्वाती पेशवे)

Comments
Add Comment