
महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा ५४ वर्षांचा जुना विक्रम मोडला
बर्मिंगहॅम: एजबॅस्टन मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या बॅटने शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या पहिल्या डावात शुभमन गिलने २६९ धावा केल्या. आता भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातही शुभमनने शतक झळकावले आहे. शुभमन गिलने शोएब बशीरच्या चेंडूवर एक धाव घेत १३० चेंडूत आपले शतक पूर्ण केले, ज्यामध्ये ९ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
शुभमन गिल हा कसोटी सामन्यात शतक आणि द्विशतक झळकावणारा दुसरा भारतीय ठरलाआहे. शुभमनपूर्वी फक्त महान फलंदाज सुनील गावस्कर हे करू शकले होते. एकाच कसोटीत द्विशतक आणि शतक करणारा गिल हा नववा फलंदाज आहे. असा पराक्रम करणारा तो दुसरा कर्णधार देखील आहे. इंग्लिश कर्णधार ग्राहम गूचने १९९० मध्ये भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात (३३३ आणि १२३) ही कामगिरी केली होती.
शुभमन गिल आता भारताकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. शुभमनने सुनील गावस्करचा ५४ वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे. गावस्कर यांनी एप्रिल १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सामन्यात एकूण ३४४ धावा (१२४ आणि २२०) केल्या.
शुभमन गिलचा असा ही एक विक्रम
- शुभमन गिल आशियाबाहेर कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज बनला आहे. यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी पाकिस्तानच्या हनीफ मोहम्मदच्या नावावर होती. १९५८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ब्रिजटाऊन कसोटीत हनीफ मोहम्मदने एकूण ३५४ धावा (१७ आणि ३१७) केल्या.
- तसेच SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये कसोटी सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावा करणारा शुभमन गिल हा तिसरा आशियाई फलंदाज आहे. त्याच्या आधी २००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनुक्रमे अॅडलेड आणि सिडनी येथे राहुल द्रविड (३०५) आणि सचिन तेंडुलकर (३०१) यांनी अशी कामगिरी केली होती.
- शुभमन गिल हा कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार देखील आहे. शुभमन गिलने या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले. २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दिल्ली कसोटीत कोहलीने एकूण २९३ धावा (२४३ आणि ५०) केल्या.
- शुभमन गिल हा पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तीन शतके झळकावणारा दुसरा कर्णधार आहे. शुभमनपूर्वी फक्त विराट कोहलीच असे करू शकला होता. विजय हजारे (भारत), जॅकी मॅकग्लू (दक्षिण आफ्रिका), ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया), सुनील गावस्कर (भारत), अॅलिस्टर कुक (इंग्लंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि धनंजय डी सिल्वा (श्रीलंका) यांनी कर्णधार म्हणून त्यांच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन शतके झळकावली.