Nanded: नांदेड येथे एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वस्तीगृहातील तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे त्याचे निधन झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी सकाळी पावने सहाच्या सुमारास आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेलमध्ये ही घटना घडली आहे. वैभव पांचाळ अस मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. असे असले तरी, वैभवचा मृत्यू नेमका पडूनच झाला आहे का, की अजून काही गोष्टी यामागे जबाबदार आहेत? याबद्दल पोलिस कसून चौकशी करत आहेत.
आठवड्यापूर्वीच वैभवला वस्तीगृहात दाखल केले होते
आनंदनगर भागात वानखेडे हॉस्टेल आणि कोचिंग क्लासेस आहेत. याच हॉस्टेलचा वैभव हा विद्यार्थी होता. तो सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आठ दिवसापूर्वी कुटुंबियांनी त्याला शिक्षणासाठी आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेल येथे दाखल केले होते. आज सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. त्यानंतर तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पायऱ्यावरुन पाय घसरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे. या प्रकरणी विमानातळ पोलिसांकडून तपास सुरु आहे.