Friday, July 4, 2025

'लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...” काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट?

'लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...” काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट?
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. मात्र, या योजनेला विरोधकांनी जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. परंतु, हे आश्वासन पूर्ण करत नसल्याबाबत विरोधक महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यातच आता काही विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला जात असल्याबाबतही सरकारवर टीका होत आहे.

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, आज पाचव्या दिवशी संजय शिरसाट विधान भवनात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? 


माझ्या खात्यामधून दर महिन्याला ४१० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला जातो. हा एकंदरीत प्रक्रियेचा भाग दर महिन्याला पूर्ण केला जातो. दर महिन्याला त्या फाइल मला मंजूर कराव्या लागतात. याबाबतची कल्पना मला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही ही गोष्ट सांगितली आहे. अजित पवार यांनी पैसे देण्याचे कबूल केले आहे. म्हणून मी आता वाद न घालता दर महिन्याला ४१० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी देत असतो, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २ हजार २८९ महिलांना वगळले आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली.
Comments
Add Comment