Friday, July 4, 2025

अफगाणिस्तानमधील तालिबानच्या सरकारला रशियाची मान्यता

अफगाणिस्तानमधील तालिबानच्या सरकारला रशियाची मान्यता
मॉस्को : रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिली आहे. तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत गुल हसन यांना स्वीकारल्याचे रशियाने जाहीर केले आहे. अफगाणिस्तानमध्ये २०२१ मध्ये तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. या सरकारला मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश आहे.

“आम्हाला विश्वास आहे की इस्लामिक अमीरात ऑफ अफगानिस्तानच्या सरकारला अधिकृत मान्यता देण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांतील विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याच्या विकासाला चालना मिळेल” असे प्रसिद्धीपत्रक रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने काढले आहे. रशियाचे उप परराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर अफगाण राजदूत गुल हसन यांची भेट घेत त्यांचं प्रमाणपत्र स्वीकारलं आहे.

तालिबान सरकारने रशियाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. रशियाच्या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास तालिबान सरकारने व्यक्त केला आहे. “आमच्या संबंधांच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे” असे तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी म्हणाले.
Comments
Add Comment