राज्यात भूस्खलन, ढगफुटी आणि पुरामुळे भीषण परिस्थिती
शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात भूस्खलन, ढगफुटी आणि पूरामुळे आतापर्यंत किमान ६३ जणांचा मृत्यू झाला असून, ४० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
राज्यात ७ जुलैपर्यंत सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सर्वात जास्त नुकसान मंडी जिल्ह्यात झाले असून, येथील थुनाग, बगस्याड, करसोग आणि धरमपूर या भागांत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विशेष सचिव डी. सी. राणा यांनी सांगितले की, आत्तापर्यंत सुमारे 400 कोटी रुपयांचे नुकसान नोंदवले गेले आहे. प्रत्यक्ष नुकसान यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. सध्या आमचा प्राथमिक भर बचाव, शोध आणि पुनर्संचयना यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात मंडी जिल्ह्यात सर्वाधिक 17 मृत्यू झाले असून कांगडा येथे 13, चंबामध्ये 6 आणि शिमला येथे 5 जण मृत्यूमुखी पडलेत. या व्यतिरिक्त बिलासपूर, हमीरपूर, किन्नौर, कुल्लू, लाहौल-स्पीती, सिरमौर, सोलन आणि ऊना जिल्ह्यांतूनही मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यासोबतच राज्यात 100 हून अधिक जण जखमी झाले असून शेकडो घरे उध्वस्त झाली आहेत. तसेच 14 पूल वाहून गेले असून 500 हून अधिक रस्ते बंद आहेत. त्याचप्रमाणे 500 पेक्षा जास्त वीज ट्रान्सफॉर्मर्स बंद असून अनेक भागात अंधार आहे. सुमारे 300 जनावरांचा मृत्यू झाला असून पिण्याचे पाणी आणि अन्नाचा तुटवडा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचलसह गुजरात, राजस्थान, उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून एनडीआरएफ पथकांची तैनाती केली आहे. आवश्यकतेनुसार अधिक पथके पाठवली जातील, असे आश्वासन दिले आहे. “केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनांकडून शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून, हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.