नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील गेल्या काही महिन्यांपासून तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, ते पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तान हॉकी संघाला रोखणार नाहीत. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, बहुराष्ट्रीय स्पर्धेत कोणत्याही संघाच्या सहभागाच्या विरोधात ते नाहीत.
हॉकी आशिया कप २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत बिहारमधील राजगीर येथे होणार आहे. क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, "भारतात होणाऱ्या बहुराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोणत्याही संघाच्या विरोधात आम्ही नाही, परंतु द्विपक्षीय मालिका ही वेगळी बाब आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांची मागणी आहे की, आम्ही कोणालाही स्पर्धेतून वगळू शकत नाही. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, परंतु ते बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळतात."
सप्टेंबरमध्ये क्रिकेटचा पुरुषांचा आशिया चषक झाल्यास भारताला पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची परवानगी दिली जाईल का, असे विचारले असता, क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, "बीसीसीआयने या विषयावर आमच्याशी संपर्क साधलेला नाही. जेव्हा ते आम्हाला याबद्दल विचारतील तेव्हा आम्ही काय करायचे ते पाहू." दरम्यान, ऑपरेशन सिंदूरमुळे पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाल्या होत्या.
भारतासह आठ संघ हॉकी आशिया कपमध्ये सहभागी होतील. आशिया कप व्यतिरिक्त, पाकिस्तानच्या संघाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही खेळण्याची परवानगी असेल.