मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरला. यजमान इंग्लंडने सलामीचा सामना हा ५ विकेट्सने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यानतंर आता उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा आज २ जुलैपासून बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक एजबेस्टन मैदानात खेळवण्यात येणार आहे.
दोन्ही संघ विजयाच्या रणनीतीनेच मैदानात उतरतील. कारण एजबेस्टन स्टेडियमवर भारताने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. १९६९ मध्ये भारताने बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला होता, अगदी तेव्हापासून भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. मागील ५८ वर्षांपासून एजबेस्टनच्या मैदानावर नेहमीच भारताचा पराभव होत आला आहे. भारताने ५८ वर्षांमध्ये या स्टेडियमवर एकूण ८ सामने खेळले आहेत. यातील ७सामने भारताने गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला. ड्रॉ सामना भारताने १९८६ मध्ये खेळला होता.
२००१ नंतर एजबेस्टन स्टेडियमवर भारताने २०११, २०१८ आणि २०२२ मध्ये कसोटी सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने भारताने गमावले आहेत. २०११ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला २४२ धावांनी पराभव झाला होता. २०१८ मध्ये ३१ धावांनी भारतीय संघ पराभूत झाला होता. तर २०२२ मध्ये ७ विकेट्सने भारताचा पराजय झाला होता. भारताने लीड्सचा पहिला सामना गमावला. सामन्यात दोन्ही डावात एकूण पाच शतके झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. याशिवाय अनेक खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना खराब कामगिरी केली. आता भारताला सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी आहे.
जोफ्रा आर्चरचं कमबॅक लांबणीवर
इंग्लंडच्या संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचे कमबॅक लांबणीवर गेले आहे. जोफ्रा आर्चर तब्बल ४ वर्षांनंतर कसोटीमध्ये कमबॅक करणार होता मात्र आता ते लांबणीवर गेल्याचे त्याला संघात स्थान न मिळाल्याने स्पष्ट झाले आहे. आर्चरने २०२१ मध्ये भारत दौऱ्यात अहमदावाद येथे कसोटी खेळली होती.
भारत पुनरागमन करणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलपुढे मोठे आव्हान असणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. भारताकडून दोन्ही डावात ५ शतक झळकविण्यात आली होती. मात्र, भारताच्या गोलंदाजांना इंग्लंडला दुसऱ्या डावात बाद करता आले नाही. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी सोडलेल्या झेलचा देखील संघाला फटका बसला. दुसऱ्या मॅचमध्ये मधल्या फळीकडून आणि लोअर मिडल ऑर्डरकडून चांगल्या कामगिरीची भारतीय संघाकडून अपेक्षा आहे.
इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीचा संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब वशीर, हॅरी बूक, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, वेन डकेट, ओली पोप, जो रुट, जेमी स्मिथ, जोश टंग आणि क्रिस वोक्स.