सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू
मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्हा, बीड व नाशिक शहरामधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत १ हजार ४१८ निवासी सदनिका व भूखंडांच्या ऑनलाइन संगणकीय सोडतीद्वारे विक्रीकरिता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा 'गो लाईव्ह' शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १ हजार १४८ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत १६४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ३९ सदनिका/ भूखंडांचा समावेश आहे. तसेच नाशिक मंडळातील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ६३ सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता ११४८ सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता २६६ सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता ४ सदनिकांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजी नगर व नाशिक मंडळाच्या संगणकीय सोडतीसाठी एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच Integrated Housing Lottery Management System (IHLMS 2.0) या नूतन संगणकीय प्रणाली व ऍपवर सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी १२.०० वाजेपासून प्रारंभ झाला आहे. छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेण्याकरिता दि. ११ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. दि. १२ ऑगस्ट, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/ NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदारच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील.
सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी दिनांक दि. १८ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक २५ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे. सोडतीचे स्थळ व दिनांक मंडळातर्फे नंतर कळविण्यात येणार आहे.