Tuesday, July 1, 2025

मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना

मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना

सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा!


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कायमस्वरूपी एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोकादायक आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांचेकडे यासंबंधीचे निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली आहे.


मुरबाडमधील जिल्हा परिषदेच्या एकूण ३२९ जिल्हा परिषद शाळा आहेत. यापैकी ९ केंद्रातील ११ शाळांना एकही शिक्षक नाही. अंदाजे ३५० विद्यार्थी एकही शिक्षक नसलेल्या शाळेत शिक्षण घेतात. गट शिक्षण अधिकारी मुरबाड यांच्याशी संपर्क साधला असता जवळच्या शाळेतील तात्पुरती शिक्षक दिले असल्याचे सांगितले. शासनाच्या धोरणानुसार बहुतांश शाळांना मोजके शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यास खासगी शाळेत दाखल केल्याचे समजते.


या शैक्षणिक धोरणाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी झाल्याचे दिसून येते. याबाबत अनेक पालकांनी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिनेश जाधव यांच्याशी संपर्क साधून खंत व्यक्त केली असता त्यांनी येत्या आठ दिवसांत ११ शाळांना कायमस्वरूपी शिक्षक न दिल्यास पक्षाच्या वतीने ११ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती मुरबाड येथे शाळा भरविण्यात येईल असा गर्भित इशारा शालेय प्रशासनाला दिला आहे.

Comments
Add Comment