उत्तर वझिरिस्तान : पाकिस्तानमधील उत्तर वझिरिस्तानमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सैनिकांच्या वाहनाला धडक दिली. धडकेनंतर स्फोट झाला. या आत्मघातकी हल्ल्यात पाकिस्तानचे १६ सैनिक ठार झाले आणि २४ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. हाफिज गुल बहादूर सशस्त्र गटाच्या आत्मघातकी बॉम्बर शाखेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले.
अफगाणिस्तानमध्ये २०२१ मध्ये तालिबानची सत्ता आली. यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद वाढला. हा वाद वाढू लागला आणि पाकिस्तानच्या वायव्य सीमेवर हल्ले होण्यास सुरुवात झाली. ताज्या हल्ल्यासाठी ५०० किलो पेक्षा जास्त स्फोटकांनी भरलेले वाहन वापरण्यात आले. शनिवार २८ जून २०२५ रोजी झालेला हल्ला हा पाकिस्तानच्या सैनिकांवर आठवड्याभरात झालेला दुसरा हल्ला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी दक्षिण वझिरिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात मेजर मोईझ अब्बाससह बारा सैनिक ठार झाले होते.