सोशल मीडिया आणि वैवाहिक जीवन

आरती बनसोडे (मानसिक समुपदेशक, मुंबई )


पूर्वीचा काळ आणि हल्लीचा काळ यामध्ये मोठा बदल झाला आहे तो म्हणजे वाढत्या समाज माध्यमांचा किंवा मोबाइलचा वापर. या मोबाइलच्या वापराचे शारीरिक आणि मानसिक परिणाम जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे; परंतु या समाज माध्यमांचा वैवाहिक जीवनावर देखील फार मोठा परिणाम होतो. हल्ली सगळ्यांचेच जीवन धकाधकीचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काळ हा घराबाहेर कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी, पैसे कमावण्यामध्ये जातो. त्यानंतर घरी आल्यावर निदान पती-पत्नीने एकत्र वेळ घालवणे हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते; परंतु हल्ली असे चित्र पाहायला मिळते की, एकमेकांमधील संवाद कमी होऊन प्रत्येकजण घरामध्ये आपापल्या मोबाइलमध्ये काहीतरी बघण्यात किंवा सोशल वेबसाईटवर चॅटिंग करण्यामध्ये व्यस्त असतात. यामुळे पती-पत्नी या नात्यामध्ये दुरावे वाढत आहेत. त्यातूनच संशय, भांडण, विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोट वाढीस लागले आहेत.


सोशल माध्यम आणि डिजिटलायझेशनमुळे जग जवळ आलेले आहे. पटकन कधीही कोणालाही संपर्क साधता येतो. पूर्वी पत्र, टपाल, तार, आंतरदेशी कार्ड अशा माध्यमातून एकमेकांच्या भावना लेखी स्वरूपात पोहोचवता यायच्या आणि त्या पोहोचायला भरपूर कालावधी लागायचा; परंतु हल्ली एका मॅसेजेसने अगदी एका सेकंदांच्या आत समोरच्याला आपल्या भावना पोहोचवता येतात. त्याचे चांगले आणि वाईट परिणाम दोन्ही पाहायला मिळतात. हल्ली जेव्हा घरात पार्टनर बोलत नाही तेव्हा ऑनलाइन उपलब्ध असलेल्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्यामध्ये वेळ मार्गी लावतात आणि चॅटिंगद्वारे एकमेकांच्या संपर्कात येतात. अशा संबंधातून वैवाहिक जीवन विस्कळीत होते.


विविध टेलिव्हिजनवरील मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज, शॉर्ट फिल्म यांमध्ये विवाहबाह्य संबंध यावरील अनेक लघुपट आणि चित्रण दाखवण्यात येते. अशा कथांमुळे देखील मानसिकरीत्या बदल होऊन आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये देखील पती किंवा पत्नी त्याचे अनुकरण करतात व यामुळे देखील विवाहबाह्य संबंध जसे की फ्रेंड्स विथ बेनिफिट किंवा फ्रेंड्स फॉर टाईमबिंग, लिव्ह इन रिलेशनशिप, सीचुएशनशिप, वन नाईट स्टॅण्ड, प्रस्थापित होण्यास हातभार लागतो. लिहून भावना व्यक्त करणं जास्त सुखकारक व सोयीस्कर असतं. त्यामुळे लहान-मोठे सगळेच चॅटिंगच्या राक्षसाला बळी पडत आहेत. विविध समाज माध्यमांवर अनेक सोशल ग्रुप उदयाला येत आहेत. आपल्या जोडीदाराला देणारा हक्काचा वेळ या अशा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपवर घालवल्यामुळे पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज होऊन नाती तुटत चालली आहेत. महिला व पुरुष दोघांनाही समाज माध्यमांवरील अशा ग्रुपमध्ये फिरण्यात आणि गप्पा मारण्यात कुटुंबापेक्षा जास्त मजा येत असल्याने काही कुटुंबात कौटुंबिक जवळीक लोप पावत चालली आहे. हल्ली सोशल मीडियावरील रील्स बघण्याचे व्यसन जोर धरत आहे. इतरांच्या कौटुंबिक सहली किंवा इतर पती-पत्नीने एकमेकांचे वाढदिवस, अॅनिव्हर्सरी निमित्ताने टाकलेले फोटो पाहून, एकमेकांची तुलना व हेवेदावे करून राग, मत्सर, द्वेष निर्माण होऊन पती-पत्नीमध्ये भांडणे वाढत चालली आहेत. नवरा किंवा बायकोची फ्रेंड लिस्ट, त्यांचे मित्र-मैत्रिणी सोबत होणारे संवाद या गोष्टींमुळे देखील पत्नीमध्ये गैरसमज वाढीस लागतात आणि ते एकमेकांना ब्लॉक करतात. पती पत्नी भांडणानंतर आपला राग सोशल मीडियावर पोस्ट टाकून व्यक्त करतात.


सोशल मीडियाचा पती-पत्नीच्या नात्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही याची खात्री करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जर पती- पत्नीचे एकमेकांसोबत खुले सोशल मीडिया संबंध असतील. याचा अर्थ पासवर्ड शेअर करणे आणि जोडीदाराला आवडणार नाही अशी कोणतीही गोष्ट कधीही शेअर न करणे, लाईक करणे किंवा प्रतिक्रिया देणे टाळणे. सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या गोष्टी मर्यादित करणे. काही जोडीदार बहुतेकदा त्यांच्या घराच्या गोपनीयतेत जे घडते ते तिथेच राहणे आवडते आणि जास्त शेअरिंगमुळे कधीकधी दोन किंवा अधिक कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होऊ शकते. आपल्या जोडीदाराची किंवा जीवनशैलीची तुलना ऑनलाइन पाहणाऱ्या इतर कोणाशीही करू नये. बहुतेकदा, सोशल मीडिया अकाउंट संपूर्ण घटना शेअर करत नाहीत आणि काही फोटो आणि व्हीडिओंच्या पडद्यामागे काय चालले आहे याची कल्पनाही नसते. जेव्हा सोशल मीडियावर पती-पत्नी गोष्टी शेअर करता तेव्हा मजेदार, आनंददायी गोष्टी शेअर करा आणि चांगल्या काळाची आठवण ठेवण्यासाठी त्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर केल्याने त्यांना देखील आनंद होईल. तसेच सोशल मीडिया वापरताना पती-पत्नीने एकमेकांना प्राधान्य देणे फार गरजेचे आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना पती-पत्नीमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता असल्यास घटस्फोटाचे प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,