ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर


ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांची ओळख ज्योतिषी, पंचागंकर्ते आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक अशी असली तरी काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख ‘शब्दकोडे रचनाकार’ अशी होती. ‘लोकसत्ता’च्या संपादकीय विभागातही त्यांनी काही काळ काम केले होते. त्यानंतर ‘शब्दरंजन’ या नावाने चालविलेल्या शब्दकोड्यांवरील मासिकाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली़ लौकिकार्थाने कमी शिक्षण झालेले साळगांवकर गाढ्या व्यासंगाच्या बळावर विद्वत्जनांचे मुकुटमणी ठरल़े. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे १ फेब्रुवारी १९२९ रोजी जन्मलेल्या जयंत साळगांवकर यांचे लौकिकार्थाने दहावीपर्यंतच शिक्षण झाले होते; परंतु अफाट वाचन, संस्कृतचा सखोल अभ्यास, गाढा व्यासंग आणि विविध क्षेत्रांतील नामवंतांचा सहवास यांतून त्यांनी परिश्रमपूर्वक अफाट बौद्धिक उंची गाठली आणि या गुणांच्या बळावरच यश पायाशी लोळण घेते, या उदाहरणाचा आदर्शदेखील मराठी जनमानसात रुजविला. ज्योतिष, पंचांग आणि भारतीय संस्कृती व धर्मशास्त्र यांचे ते गाढे अभ्यासक होते. पंचांग आणि दिनदर्शिका यांचा कल्पक मेळ घालून त्यांनी ‘कालनिर्णय’ ही दिनदर्शिका १९७३ मध्ये सुरू करून पंचांगालादेखील वाचनीय केले आणि घराघराच्या भिंतीवर पंचांग दिसू लागले. ‘कालनिर्णय’ हा जणू पंचागांचाच प्रतिशब्द वाटावा इतके हे पंचांग घराघरांत रुळले. आपल्या कल्पक व्यावसायिक कौशल्याने त्यांनी कालनिर्णय हा एक ब्रँड म्हणून बाजारात आणला आणि तो इतका यशस्वी केला की, आज नऊ भाषांमधून प्रकाशित होणारी ही दिनदर्शिका देशाची भौगोलिक सीमा ओलांडून सातासमुद्रापार पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अफाट लोकप्रियता मिळालेल्या या दिनदर्शिकेच्या मराठी भाषेतील आवृत्तीचा खप ४८ लाखांहून अधिक आहे. वृत्तपत्रांतून राशिभविष्य आणि शब्दकोडे लोकप्रिय करण्याचे श्रेय साळगांवकर यांनाच आहे.


भविष्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘धनुर्धारी’ या दिवाळी अंकातील राशिभविष्यही काही वर्षे त्यांनी लिहिले होते. नियतकालिकांतील भविष्यलेखनाला ललित शैलीची जोड दिल्यामुळे हा काहीसा चौकटीबाहेरचा, रुक्ष वाटणारा विषयही वाचकांनी आवडीने स्वीकारला आणि भविष्यवाचनाची गोडी मराठी वाचकांमध्ये रुळली. साळगांवकर यांची आजची ओळख ज्योतिषी, पंचागंकर्ते आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक अशी असली तरी काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख ‘शब्दकोडे रचनाकार’ अशी होती.


काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘कालनिर्णय वर्तमान’ हे मराठी दैनिकही सुरू केले. भविष्याचा अभ्यास असलेल्या साळगांवकरांचे हे ‘वर्तमान’ मात्र फारसे टिकले नाही. एक-दोन महिन्यांतच ते बंद पडले. साळगांवकर यांच्या ‘देवाचिये द्वारी’ या सदरास प्रचंड लोकप्रियता लाभली होती. सलग चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या सदरातील लेखांचे संकलन असलेली पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्य, राजकारण, समाजकारण, व्यापार, आदी अनेक क्षेत्रांत सहजपणे वावरणाऱ्या साळगांवकरांनी समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील असंख्यांशी कौटुंबिक ऋणानुबंधांचे नाते जपले. त्यामुळे सामान्य माणसालादेखील ते नेहमी आपलेसे वाटत राहिले. ज्योतिष आणि धर्मशास्त्रांवरही साळगांवकर यांनी विपुल लेखन केले. या विषयांवरील त्यांचे दोन हजारांहून अधिक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत. साळगांवकर हे निस्सीम गणेशभक्त होते. गणपतीविषयक विविध श्रद्धा, अंधश्रद्धा, गणपतीचे महत्त्व याविषयीही त्यांनी विविध वृत्तपत्रे आणि मासिकातून लेखन केले होते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थामध्ये ते कार्यरत होतेच पण अनेक संस्थांचेही ते प्रमुख आधारस्तंभ होते. वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळ साळगांवकर यांनी बांधलेले गणपती मंदिर हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान ठरले असून या मंदिरातील गणपतीची मूर्ती सोन्याची आहे. धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या रुद्राक्षाचे महत्त्व खूप मोठे आहे. सर्वसामान्य श्रद्धाळू लोकांमध्ये धार्मिक, आध्यात्मिक आणि भक्ती मार्गाची आवड उत्पन्न व्हावी तसेच जपाच्या माध्यमातून त्यांना मानसिक शांती मिळावी, यासाठी साळगांवकर यांनी काही हजार रुद्राक्ष माळा लोकांना वाटण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे त्यांनी अनेक जणांना या माळांचे वाटप केले होते.


त्यांच्या आयुष्यात आलेली वेगवेगळी वळणं, चढउतार, त्या सगळ्यांतून बावनकशी सोन्यासारखे तावून सुलाखून बाहेर पडलेले जयंत साळगावकर म्हणजे एक आश्चर्याचा प्रवास आहे. त्यांनी मालवणमध्ये ‘ज्योती’ नावाचे एक नियतकालिक चालवलं होतं. प्रचलित तसंच संत साहित्याच्या वाचनामुळे त्यांना शब्द, त्यांचे अर्थ, त्यातले बारकावे यांचं चांगलं ज्ञान होतं. सुरुवातीला मराठी भाषकांमध्ये स्थान मिळवलेल्या कालनिर्णयाचा नंतर इतर भाषांमध्ये जो पसारा वाढला तो पाहता कॅलेंडर कसं असावं, याबद्दलचा विचार हा फक्त मराठी मनापुरता सीमित नव्हता, तर तो एकूणच सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांना सामावून घेणारा होता हेच स्पष्ट होतं. कालनिर्णयाचा जम बसल्यानंतर त्यांनी स्वत:चं मुद्रणालय सुरू केलं. जर्मनीहून मोठं मशीन आणलं. पुढे त्यांनी आणखी मशिन्स वाढवली. हळूहळू सुमंगल प्रेसचं नाव मुंबईतलं एक मोठं मुद्रणालय असं घेतलं जाऊ लागलं. अनेकविध प्रकारची माणसं त्यांच्या आयुष्यात आली. त्यात अनेक मोठमोठी माणसं होती.


(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत. )

Comments
Add Comment

...म्हणून समाज मोदींना मानतो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते देशाचे पंतप्रधान इतका मोठा आणि अविश्वसनीय प्रवास करणारे नरेंद्र मोदी

मराठी पत्रकारितेचे जनक - बाळशास्त्री जांभेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर आचार्य अत्रे यांनी कै. बाळशास्त्री जांभेकर यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ असे म्हटले

छडी वाजे छमछम

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू मुलं लहान असतानाच शिस्त लावण्याची सुरुवात करायला हवी. पण मुलं लहान असताना

“...हम भी देखेंगे!”

बरोबर १०३ वर्षांपूर्वींची इम्तियाज अली ताज यांची एक कादंबरी सिनेदिग्दर्शक के. आसिफ यांना इतकी आवडली की त्यांनी

घेता घेता...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आमच्या शाळेच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता

कथा सोमकांत राजाची

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे सर्व देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणेशाच्या विविध वैशिष्ट्याचे