Friday, October 24, 2025
Happy Diwali

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत?

सफाळे: पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र या प्रकल्पाच्या कामामुळे गावातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व लहान बालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायतीने संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे विविध समस्यांबाबत निवेदन दिले आहे. ग्रामपंचायत मांडेच्या या निवेदनाकडे प्रकल्प यंत्रणेने सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे. अन्यथा ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ग्रामपंचायत मांडेने प्रकल्प संचालक व सक्षम अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात या प्रकल्पासाठी तोडलेला शाळेचा रस्ता त्वरित नव्याने करावा, ग्रामपंचायत मुख्य रस्त्यापासून जिल्हा परिषद शाळेपर्यंतचा पक्का रस्ता प्रकल्पकामामुळे तोडण्यात आला असून पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे लहान बालकांना व विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.

तत्काळ काँक्रीट रस्त्याची मागणी करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनच्या बांधकामामुळे अनेक नैसर्गिक नाले अडवल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान होत आहे. अशा ठिकाणी जलवाहिनी पाईप्स बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

वीज व पाणी यांची एकाच ठिकाणी लावलेली लाईन धोकादायक असून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अंडरग्राऊंड पाणी व विजेच्या केबल्स एकत्र लावण्यात आल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेला योग्य बदल करण्याची विनंती केली आहे. दैनंदिन अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे मांजुर्ली ते शिलटे या मार्गावरील रस्ता अत्यंत खराब झाला असून नव्याने काँक्रिटीकरण करून देण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Comments
Add Comment