एकनाथ शिंदे आक्रमक, उबाठा सेना हतबल

शिवसेना पक्षाचा मेळावा मुंबईत संपन्न झाला. यापूर्वी शिवसेना पक्षाचा १९ जून रोजी एकच मेळावा व्हायचा. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्वाधिक आमदारांनी, खासदारांनी, माजी नगरसेवकांनी, पक्षीय पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या अरेरावीला, एककल्ली कारभाराला व सत्तेसाठी हिंदुत्वाला बासनात गुंडाळत काँग्रेसशी युती केल्याच्या निर्णयाचा संताप व्यक्त करत वेगळी राजकीय चूल मांडली. निवडणूक आयोगानेही लोकप्रतिनिधी व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या संख्याबळाकडे पाहता एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत शिवसेना व शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या स्वाधीन केले. सत्तेसाठी हिंदुत्वाच्या ध्येयधोरणाला तिलांजली देत काँग्रेसशी मांडीला मांडी लावल्याने उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह गमवावे लागले आणि अखेरीला त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या नव्या नावाने मशाल निवडणूक चिन्हाच्या मदतीने राजकीय वाटचाल करण्याची वेळ आली. एकाच नावसाधर्म्य असलेल्या दोन संघटनांचे मेळावे एकाच दिवशी मुंबईत साजरे झाले. अर्थात वैचारिक मतभेद, राजकीय वाद म्हटल्यावर दोन्ही संघटनांच्या प्रमुखांकडून एकमेकांकडून आरोप-प्रत्यारोप, राजकीय चिखलफेक होणे स्वाभाविकच आहे. याही वेळी दोन्ही संघटनांच्या मेळाव्यामध्ये हाच प्रकार झाला. पक्षाच्या स्थापना दिनाचा मेळावा म्हटल्यावर पक्षाची पार्श्वभूमी, पक्षाची आजवरची वाटचाल, आगामी ध्येयधोरणे यावर विचारविनियम होऊन पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणे आवश्यक होते. पण उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये तोच संवादाचा प्रकार कायम ठेवल्याने उबाठा सेनेच्या सैनिकांना नेहमीप्रमाणे याही मेळाव्यात विचारांची दिशा मिळालीच नाही. माझा बाप चोरला, पक्ष चोरला, निवडणूक चिन्ह चोरले या पलीकडे उद्धव ठाकरेंना पक्षफुटीनंतर विशेष काहीही बोलता आले नाही; परंतु त्यांनी राणा भीमदेवी थाटाचा आवेश निर्माण करत अंगी नसलेले शौर्य दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्या आरोपाचा थेट पंचनामा करत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी सर्व चिरफाड करत उबाठांचे वस्त्रहरणच केले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून ‘किल मी’ आणि ‘मला मारायला येताना रुग्णवाहिका घेऊन या, त्याच रुग्णवाहिकेतून परत पाठविले जाईल’ असा इशारा दिला होता. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या या आरोपाला उत्तर देताना आधीच मेलेल्यांना कोण परत मारणार? विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी आधीच उबाठाला संपविले आहे. ज्या माणसाला आपल्या पक्षातील फूट थांबविता आली नाही, लोकप्रतिनिधींना तसेच पक्षीय पदाधिकाऱ्यांना पक्षातून बाहेर जाताना थांबविणे शक्य झाले नाही, आजही उबाठा सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती सुरूच आहे. ही गळती थांबविणे उबाठा सेनाप्रमुखांना शक्य झाले नाही, त्यांनी रुग्णवाहिकेची भाषा बोलावे, याची एकनाथ शिंदेंनी खिल्ली उडविताना ठाकरेंना त्यांच्या राजकीय ताकदीची जाणीव करून दिली आहे.


वर्धापन दिन कार्यक्रमात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पुण्यात घडलेल्या वैष्णवी प्रकरणावरही एकनाथ शिंदेंनी भाष्य करताना घरातील महिलांच्या मान-सन्मानाबद्दल, त्यांच्या रक्षणाबद्दल निर्देश दिले. घरातील सुनांच्या रक्षणाबाबतचा संदेश देताना शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या नव्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. हुंडाविरोधी अभियान शिवसेनेने सुरू केले असून याच्या लोगोचे उद्घाटनही या कार्यक्रमात करण्यात आले. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळीच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये राजकीय पार्श्वभूमी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या घरातही सुनांचा छळ झाल्याने त्यांनीही आत्महत्या केल्याच्या घटनांनी महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाची मान शरमेने खाली गेली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नव्या अभियानाची घोषणा केली. हुंडाबळीची वाढती प्रकरणे मराठी संस्कृतीला बट्टा लावत आहे, हे वेळीच थांबवणे गरजेचे आहे. यासाठीच पुन्हा एकदा शिवसेना सज्ज झाली आहे. जिथे घरातील सुनेचा हुड्यांसाठी छळ केला जाईल, तिथे शिवसेना या घरातल्यांची त्यांना समजेल अशा भाषेत समजूत काढेल. शिवसेनेच्या वाघिणी या पुढाकार घेतील, शिवसेना महिला आघाडी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या, सुनांच्या रक्षणासाठी हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी ‘लाडक्या सुनेचे रक्षण, हेच आहे शिवसेनेचे वचन’ हे अभियान सुरू केले. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. तसेच महाराष्ट्रातील विविध भागांत हुंडाबळीच्या घटना समोर आल्या. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने हुंडाविरोधात काम करण्यासाठी नवा कार्यक्रम महिला आघाडीला दिला आहे.


मेळाव्याच्या निमित्ताने शिवसैनिकांना खऱ्या अर्थांने योग्य संदेश दिला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. हिंदुत्व व सत्ता याबाबतही बोलताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी केलेल्या सलगीचाही एकनाथ शिंदेंनी समाचार घेतला आहे. सत्तेसाठी हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असा खणखणीत टोला लगावताना सत्ता नाही एक वेळ मिळाली तरी चालेल, पण हिंदुत्वाशी तडजोड करणार नसल्याचे सांगत उबाठांनी काँग्रेसशी सत्तेसाठी युती केल्याच्या प्रकारावरही त्यांनी टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी हयात काँग्रेसविरोधात घालविली, त्याच शिवसेनाप्रमुखांच्या पुत्रांनी मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीशी युती केली. याची किंमत उबाठांना चुकवावी लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्या ताब्यात असतात, त्यांना विधानसभा, लोकसभा निवडणुका लढविणे नाही तर जिंकणेही शक्य असते. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यप्रणालीचा, पाकिस्तानविरोधातील युद्ध जिंकल्याचा तसेच हिंदुत्ववादी विचारांचाही शिंदेंनी भाषणात उल्लेख करताना हिंदुत्व हाच शिवसेनेचा यापुढील काळातही अजेंडा कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांना उत्साहित करण्याचे काम एकनाथ शिंदेंनी या मेळाव्याच्या माध्यमातून केले आहे. एका मेळाव्यामध्ये त्याच त्याच भाषणातून काहीही पदरात पडले नसताना दुसऱ्या मेळाव्यातून मात्र शिवसैनिकांना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन, हिंदुत्वाचा जागर आणि उबाठांनी केलेल्या आरोपांची चिरफाड पाहावयास मिळाली. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा आणि हिंदुत्वाचे समर्थंन शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतच होत असल्याचे या मेळाव्याच्या माध्यमातून पाहावयास मिळाले.

Comments
Add Comment

China Taiwan : तैवानची कोंडी

चीनच्या सततच्या गस्तीमुळे तैवानच्या लष्कराला २४ तास हाय-अलर्टवर राहावे लागते. परिणामी त्यांच्या सैनिकांमध्ये

मोशी : निष्काळजीपणाचे बळी

मोशी कचरा डेपोत घडलेली प्रशासकीय हलगर्जी आणि भ्रष्टाचाराची भीषण परिणती आठ निष्पाप कामगारांच्या मृत्यूच्या

Cricket Update : निराशाजनक पर्व

कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हे अपयश एका अग्निपरीक्षेसारखे आहे. आगामी झिम्बाब्वे मालिकेपूर्वी भारतीय संघाला केवळ

Development vs Environment : विकास, की विकासाचा ऱ्हास?

‘प्रजा’ संस्थेच्या २०२६ च्या अहवालातून मुंबईतील कचरा, प्रदूषण, वाहतूक आणि इतर नागरी समस्यांचे गंभीर चित्र समोर

Konkan Folk Art : कोकणातल्या लोककलेला राजाश्रय

सिंधुदुर्गातील दशावतार, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, रायगड जिल्ह्यातील आदिवासी तारफा नृत्य या सर्वांची

लँडमार्क करार

भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचा आणि इंडो-पॅसिफिकमधील वाढत्या रणनीतिक भूमिकेचा ठसा उमटवत पंतप्रधान