बडगुजर यांचा प्रवेश; काही पेच, काही संदेश

नाशिक बीट‌्स : प्रताप म. जाधव


उबाठातून भाजपात स्वागत करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून प्रदेश पक्षश्रेेष्ठींनी स्थानिक पातळीवर व्यापक दृष्टिकाेन स्वीकारण्याचा संदेश दिला आहे; मात्र अनेकांचा विरोध-आक्षेप असलेल्या या निर्णयामुळे पक्षात काही पेचही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.


नाशिक शहरातील सर्वच लहानमोठे प्रश्न - समस्या बाजूला पडून कमालीचे महत्त्व प्राप्त झालेल्या एका प्रश्नावर अखेर तोडगा निघाला. उबाठा गटाचे एक स्थानिक मातब्बर नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश होणार, की नाही याचा फैसला मंगळवारी बडगुजरांच्या बाजूने लागला. नाशिक शहर आणि काही प्रमाणात जिल्ह्यामध्ये दोनतीन आठवडे याच विषयावर चर्चा होती. अर्थात, याला माध्यमांनी दिलेल्या तडाखेबंद प्रसिद्धीचाही हातभार लागला. त्यामुळे अगदी राज्यपातळीवरही या संदर्भात औत्सुक्य निर्माण झाले होते. वृत्तवाहिन्यांवरील हेडलाइन्समध्ये ही एक लाईन होतीच.


कुंभमेळ्याच्या कामांचे काय होणार, पावसाळा अंमळ आधीच सुरू झालेला असताना रस्त्यांच्या बिकट अवस्थेवर काय उपाय करणार, शहरात विविध ठिकाणी रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कोणती कायमस्वरूपी योजना करणार, ठिकठिकाणी लोक ‘पाणी, पाणी’ ओरडत असताना त्यांची तहान कशी भागवणार असे सारे किरकोळ प्रश्न आणि असुविधा या काळात जणू सारेच विसरून गेले होते. केवळ बडगुजरच नव्हे, तर इतरही अनेक स्थानिक नेत्यांच्या इकडून तिकडे जाण्याने सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, असा विचार - ज्याच्या खिजगणतीतही हा माणूस नसतो - त्यांनी करण्याचे काहीच कारण नव्हते; पण खुद्द हा सामान्य माणूसही या राजकीय चर्चांमध्ये रमून गेला होता. असो.


ज्यांच्या राजकीय हुशारीने एवढे मोठे फुटेज घेतले आणि रकाने व्यापले, ते श्री. बडगुजर मुळात तसे राजकारण नव्हेत. ते मूळचे महापालिकेतील मोठे कंत्राटदार. त्यांनी राजकारणात प्रवेश करायलाही जेमतेम १७-१८ वर्षे झालेली; पण धडाक्याने पुढे जाण्यात माहीर असलेल्या बडगुजरांनी पूर्वीची एकसंघ शिवसेना आणि नंतरची उबाठा यात बिनीचे स्थान प्राप्त केले. लहानमोठी लोकाभिमुख कामे करून प्रभागाला आदर्श करण्यासारख्या बाबी त्यांची आणखी एक जमेची बाजू. मात्र, दीर्घ काळ काम करत राहून संयमाने योग्य संधीची वाट पाहत राहणे हा त्यांचा पिंड नव्हता आणि यापुढेही राहणार नाही. जे काही करायचे ते पूर्ण जोर लावून आणि त्यात कोणतीही कसूर सोडायची नाही, हाच त्यांचा खाक्या आहे. त्यामुळे एखादी गोष्ट ठरवली, की आत्मविश्वासाने ते त्या दिशेने पुढे जातात. त्यांचा हा आत्मविश्वास इतका दांडगा, की मंगळवारी खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाची काही माहिती नसल्याचे सांगत असताना बडगुजर मात्र मुंबईच्या दिशेने समर्थकांसह निघालेही होते आणि ‘सगळं काही ठरलंय, दुपारपर्यंत वाट पाहा’, असं ठामपणे सांगत होते. बावनकुळे, चव्हाणांनी त्यांना मुंबईतील प्रदेश कार्यालयात तास दोन तास ताटकळत ठेवले खरे; पण शेवटी त्यांच्याच हस्ते बडगुजर यांचा समारंभपूर्वक पक्ष प्रवेश घडवण्यात आला. नाशिक शहरात या प्रवेशाला असणारा तीव्र विरोध पाहता या निष्ठावंत गटाला काहीसा दिलासा देण्यासाठी बडगुजर यांना थाेडेसे तिष्ठत ठेवले असावे. यावेळी मंत्री गिरीश महाजन मागे होते; पण या प्रवेशात त्यांचाच पुढाकार होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही. खुद्द बडगुजर यांनाही थोडीफार धास्ती असावी, हे त्यांची देहबोली व प्रवेशोत्तर भाषण यातून जाणवले. ‘महाजन हे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनीच मलाही संकटातून बाहेर काढले’, असे बडगुजर म्हणाले, त्यावरून त्यांनी अंदाज केला होता, तेवढा सोपा हा प्रवेश झालेला दिसत नाही.


त्यांना भाजपात प्रवेश देण्यास गेल्या विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या विजयी प्रतिस्पर्धी आ. सीमा हिरे यांचा विरोध असणे तर साहजिकच होते; पण शहरातील भाजपाच्या अन्य दोन आमदारांनीही (देवयानी फरांदे व राहुल ढिकले) प्रदेश पक्षश्रेष्ठींकडे यास आक्षेप नोंदवला होता. मात्र, ताज्या घडामोडी पाहता फरांदे यांनी नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायचे ठरवलेले असावे; कारण, गुरुवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या बडगुजरांनी केलेल्या स्वागताला आ. फरांदे यांनी हजेरी लावली. आ. हिरे व आ. ढिकले भविष्यात याला कसा प्रतिसाद (उघड असो, की छुपा) देतात, याची त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना उत्सुकता असेल.


दुसरीकडे, बडगुजर यांच्या प्रवेशाला नाके मुरडली जात असली आणि त्यांच्यावरील आरोपांकडे अंगुलीनिर्देश केला जात असला तरी भाजपाच्या व्यापक धोरणानुसारच हा निर्णय झाला आहे, हे अमान्य करण्यात अर्थ नाही. तीनचार महिन्यांवर आलेली महापालिका निवडणूकही बडगुजर यांच्या प्रवेशाला सहाय्यभूत ठरली असावी; अन्यथा एरवी आणखी कालापव्यय होऊ शकला असता. मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये तसे अपयश माहीत नाही. गेल्या निवडणुकीत त्यांच्या दिग्दर्शनाखाली भाजपाने नाशिक महापालिकेत सहज बहुमत मिळवले. यावेळी भाजपाने ‘शंभर अधिक’चे लक्ष्य ठेवले आहे. महायुतीने एकत्र निवडणूक लढवली तर सत्ताधारी सहज शंभरी पार करतील. भाजपा एकट्याच्या बळावर लढला तरीही हा आकडा त्यांना दुष्प्राप्य नाही. महाविकास आघाडीची (?) स्थानिक मंडळीही कदाचित खासगीत हे मान्य करील, एवढ्या गलितगात्र अवस्थेतून ते सध्या जात आहेत. पुढच्या शक्याशक्यता लक्षात घेऊनच भाजपा (आणि शिंदे शिवसेनादेखील) आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. निवडणूक जसजशी जवळ येत जाईल, तसतसे हे प्रयत्न अधिक वेग घेतील, हे सांगायला पाहिजे का?

Comments
Add Comment

जन्मदात्या आईनेच विकले सहा चिमुरडे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे हादरवणारी घटना नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव

मनमाड-कसारा, कसारा-मुंबई मार्गावर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनला केंद्राकडून मंजुरी

तांत्रिक अडथळे दूर होणार; खा. राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश नाशिक : नाशिक तसेच उत्तर

सप्तशृंगगड घाटात इनोव्हा कार ७०० फूट दरीत कोसळली; सहाजण ठार

सप्तशृंगगड : नांदुरी ते श्री सप्तशृंगगड घाटरस्त्यावर रविवारी ( दि.७) संध्याकाळी भाविकांची इनोव्हा कार सुमारे ७००

सप्तशृंगी गडाच्या मार्गावर अपघात, दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू

नाशिक : सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात इनोव्हा कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. सुमारे १००० ते १२०० फूट खोल

नाशिक जिल्ह्यातील ११ नगर परिषदांसाठी आज होणार मतदान

नगरसेवक पदासाठी १०२८, तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार आखाड्यात नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ११

कुंभमेळा आरक्षित क्षेत्राचे संपादन न करता कारवाई रद्द करावी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर