Saturday, October 25, 2025
Happy Diwali

हॉटेल, ढाब्यांवरील वायू प्रदूषणाकडे महानगरपालिका करतेय डोळेझाक !

हॉटेल, ढाब्यांवरील वायू प्रदूषणाकडे महानगरपालिका करतेय डोळेझाक !

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

विरार : हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि बेकऱ्यांमध्ये होत असलेला लाकूड आणि कोळशाचा वापर थांबवून वायू प्रदूषण रोखण्याकरिता उपाययोजना करण्याचे निर्देश वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकांना देण्यात आले आहेत. वसई-विरार महानगरपालिकेने मात्र या बाबीला गंभीरतेने घेतले नसल्याचे चित्र असून, गेल्या दहा महिन्यांपासून महानगरपालिकेने या संदर्भातला सर्व्हेच पूर्ण केलेला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन वायू प्रदूषणासारख्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईसह लाखोंची लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात वायू प्रदूषण वाढत चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि वसई-विरार या सात महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि ढाब्यांवर लाकूड आणि कोळशाचा वापर करून तंदूर भट्टी चालवल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. लाकूड व कोळशा सारख्या पारंपरिक इंधनाचा वापर पुढील एक वर्षात टप्प्याटप्प्याने बंद करून त्याऐवजी स्वच्छ इंधन वापरण्यासाठी हॉटेल, ढाबा, बेकरी व्यवसायिकांना निर्देश देण्यात येणार आहेत. संबंधित व्यवसायिकांनी पीएनजी, सीएनजी, एलपीजी तसेच इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर करावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचनाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईसह इतर महापालिकांनी या संदर्भात सर्व्हे करून तशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली आहे .

वसई-विरार महानगरपालिका मात्र यामध्ये मागे राहिलेली आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती कार्यक्षेत्रात कोळसा व लाकडाचा वापर होत असलेल्या व्यवसायिकांची माहिती मुख्य कार्यालयाकडून मागविण्यात आली होती. प्रभाग समितीने कार्यक्षेत्रातील बेकरी, हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांचे सर्वेक्षण करून लाकूड व कोळशाचा वापर किती प्रमाणात केल्या जातो याची माहिती सादर करावी यासाठी विहित नमुना देखील पुरविण्यात आला. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या" ए" पासून "आय"पर्यंत सर्व नऊ प्रभाग समिती कार्यालयाकडून मात्र विहित नमुन्यात आणि परिपूर्ण असा अहवाल अद्यापही सादर केला नाही.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार नऊ प्रभाग समिती ना विहित नमुन्यात सर्वे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. वायू प्रदूषण करणाऱ्या हॉटेल, ढाबा बेकरी व्यावसायिकां विरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात यईल. - अजित मुठे, उपायुक्त पर्यावरण विभाग . वसई-विरार महानगरपालिका

Comments
Add Comment