Saturday, October 25, 2025
Happy Diwali

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे, भारतीय दूतावासाचे आवाहन

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे, भारतीय दूतावासाचे आवाहन

भारतीय दूतावासाने केले आपल्या नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : इराणच्या तेहरान शहरावर होणाऱ्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीयांनी तत्काळ दुसऱ्या एखाद्या सुरक्षित शहरात स्थलांतरित व्हावे असे आवाहन भारतीय दूतावासाने केले आहे. तसेच तेहरानमधून बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्था होईपर्यंत त्यांनी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे.

इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, सर्व भारतीय नागरिकांना तेहरान शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने तेहरानमध्ये असलेल्या आणि दूतावासाच्या संपर्कात नसलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तात्काळ दूतावासाशी संपर्क साधून त्यांचे स्थान आणि संपर्क क्रमांक देण्याची विनंती केली आहे. संपर्क क्रमांक +989010144557, +989128109115 आणि +989128109109 असल्‍याचेही निवेदनात नमूद केले आहे.इराण आणि इस्रायलमधील वाढत्या लष्करी तणावादरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सध्या तीन विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. इराणमध्ये सुमारे 10 हजार भारतीय विद्यार्थी आहेत, ज्यात 1500 काश्मिरी आहेत. बहुतेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी तेथे वास्‍तव्‍यास आहेत.

इराणमध्‍ये अडकलेल्या 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे सुनिश्चित करण्यासाठी भारताने इराणला आवाहन केले होते. प्रत्युत्तरादाखल, तेहरानने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना अझरबैजान, तुर्कमेनिस्तान किंवा अफगाणिस्तानच्या जमिनीच्या सीमेवरून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार , इराणचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्मेनिया मार्गे बाहेर काढले जात आहे. आर्मेनियातील विद्यार्थ्यांना जॉर्जिया आणि नंतर पश्चिम आशिया मार्गे भारतात आणता येईल. 110 विद्यार्थ्यांचा पहिला गट आर्मेनिया सीमेवर पोहोचला आहे. यापूर्वी, भारतीय दूतावासाने सोमवारी तेहरानमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बसेसची व्यवस्था केली होती.

Comments
Add Comment