‘रहने दे अभी थोडासा भरम...’

श्रीनिवास बेलसरे


सुंदरलाल नहाटा यांनी १९६७ साली जितेंद्र आणि बबिताला घेऊन ‘फर्ज’ काढला. तो सिनेमा मुळात ‘गुडाचारी ११६’ या तेलुगू सिनेमावर बेतलेला होता. गुडाचारी निर्माण झाला होता तो त्या काळात तरुणाईवर पडलेल्या ‘जेम्स बाँड’च्या प्रभावातून! मग फर्जचे यश पाहून रामानंद सागर यांनी लगेच १९६८ ला धर्मेंद्र आणि माला सिन्हाला घेऊन ‘आंखे’ काढला. ‘आंखे’ हा मनोरंजक गुप्तहेरपट होता. साहिरच्या लेखणीतून उतरलेली त्याची एकापेक्षा एक अर्थपूर्ण गाणी रवीजींच्या संगीतामुळे कर्णमधुर झाली होती. ती आजही जुन्या रसिकांच्या लक्षात आहेत!


‘आंखे’चे चित्रीकरण लेबनानची राजधानी असलेल्या बेरूतमध्ये केले गेले. मेहमूद, ललिता पवार, जीवन, धुमाळ आणि मदन पुरी यांच्या भूमिका असलेल्या ‘आंखे’ने बॉक्स ऑफिसवर कमाईचा उच्चांक गाठला होता. या सिनेमाने रामानंदजींना सर्वोत्तम दिग्दर्शनाचे ‘फिल्मफेयर’ आणि श्री. जी. सिंग यांना सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफीचे फिल्मफेयर मिळवून दिले!


सिनेमाची सर्वच गाणी हिट ठरली. साहिर सिनेमाचे फक्त नाव लक्षात घेऊन किती सुंदर गाणे लिहू शकत होते ते शीर्षकगीताने सिद्ध केले.


‘उस मुल्ककी सरहद को कोई छु नहीं सकता,
जिस मुल्क के सरहदकी निगेबान हैं आंखे.’
या शेरने सुरू होणारे रफींसाहेबांच्या आवाजातले गाणे थियेटरबाहेर कधी ऐकायला मिळाले नाही. पण देशाच्या संरक्षण विभागाच्या, विशेषत: सीमा सुरक्षा दलाच्या जबाबदारीची जणू व्याख्याच करणारा त्याचा आशय जबरदस्त होता. या पार्श्वभूमीवर अलीकडचीच एक घटना नकळत डोळ्यांसमोर येते. शत्रू राष्ट्रांतून ४/५ लोक शस्त्रांसह देशात शिरतात. निष्पाप पर्यटकांना त्यांची नावे, धर्म विचारून त्यांच्या मुलाबाळांसमोर ठार करतात आणि शांतपणे गायब होऊन जातात ही गोष्ट आपल्या दक्षतेबद्दल खूप काही सांगून जाते. आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या लोकांचे डोळे किती कर्तव्यदक्षपणे कार्यरत असतात तेच या घटनेने स्पष्ट झाले. असो. साहीरसाहेबांनी मात्र शीर्षक गीतात त्यांचे काम चोख बजावले होते.


लतादीदींच्या आवाजातील ‘मिलती हैं जिंदगी में मुहब्बत कभी कभी’ विविध भारतीवर आणि रेडिओ सिलोनवर खूप गाजले. ते १९६८ साली बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात ८ व्या क्रमांकावर वाजले होते! हे गाणे श्रोत्यांचे जास्तच लाडके होण्याचे कारण म्हणजे त्याकाळी मुहब्बत खरोखर ‘कभी कभी’च मिळणारी गोष्ट होती. हल्लीसारख्या चटकन रिफील करता येणाऱ्या पॅकमध्ये मुहब्बत सर्वत्र आणि विपुल प्रमाणात उपलब्ध नसायची!


‘आंखे’ची कथा सरळ होती. धर्मेंद्र हा भारतीय गुप्तहेर ज्युडो शिकायचे निमित्त करून जपानमध्ये जातो. तिथे त्याची भेट मीनाक्षीशी (माला सिन्हा) होते. स्व. नेताजींच्या ‘आझाद हिंद सेने’तील एका सेनाधिकाऱ्याची ही मुलगी धर्मेंद्रच्या प्रेमात पडते. धर्मेंद्र तिला परोपरीने समजावून सांगतो की मी ज्या व्यवसायात आहे तिथे जीवनापेक्षा मृत्यूची शाश्वती जास्त आहे. त्यामुळे मला प्रेम करणे जमणार नाही. यावर अतिशय आनंदी स्वभावाची मीनाक्षी जे उत्तर देते तेही विलक्षण होते. ती म्हणते, ‘जितकी जगण्याची खात्री कमी तितके प्रेम लवकर करून टाकले पाहिजे. नंतर ईश्वराने माणसाला दिलेल्या इतक्या अमूल्य देणगीपासून उगाच वंचित राहिलो हे दु:ख नको.’


साहीरने ‘आंखे’च्या सर्व गाण्यात जीवनाबद्दलचे आपले आकलन कलात्मकपणे मांडले आहे. शीर्षक गीतात तो म्हणतो, ‘तुलता हैं बशर जिसमे वो मिजान हैं आंखे’ मिजान म्हणजे तराजू. माणसाची नियत त्याच्या डोळ्यांत दिसते. कुणाचाही खरेपणा मोजण्याचा तराजू म्हणजे त्याचे डोळे होत. दुसऱ्या गाण्यात मालासिन्हा एका पार्टीत धर्मेंद्रला त्याच्या दुसऱ्या चाहतीच्या सोबत क्लबमध्ये पाहते. तेव्हा तिच्या तोंडी लतादीदींच्या नाजूक आवाजात एक गाणे होते-


‘ गैरोंपे करम अपनों पे सितम,
ए जान-ए-वफा ये ज़ुल्म न कर.
रहने दे अभी थोड़ासा भरम,
ए जान-ए-वफा ये ज़ुल्म न कर.’
‘तुझे माझ्यावरचे प्रेम हा कदाचित मला झालेला भ्रम असेल तरी तो अजून थोडा वेळ राहू दे’ असे आर्जव करणारी मीनाक्षी म्हणते असे परक्यांशी जवळीक साधणे आणि तुझ्या प्रामाणिक चाहत्यांशी दुरावा पाळणे असे करू नकोस रे! माझे खरेच तुझ्यावर प्रेम आहे आणि तू असे मलाच अस्वस्थ करणे चांगले आहे का? सर्वांसमोर माझी शोभा होईल इतके तू मला छळणे चांगले नाही रे! मी तर तुझ्या अशा दुराव्याने संपेन, मरूनच जाईन!


‘हम चाहनेवाले हैं तेरे,
यूँ हमको जलाना ठीक नहीं.
महफिलमें तमाशा बन जाएँ,
इस दर्जा सताना ठीक नहीं.’
मर जाएँगे हम मिट जाएँगे हम,
ए जान-ए-वफा ये ज़ुल्म न कर.’
तुझे हाथ असे परक्यांच्या खांद्यावर बघताना कसे वाटते तुला काय माहित! तू काहीही केलेस तरी मी सहनच करेन पण अशा गोष्टी एका प्रेमिकेने कशा सहन करायच्या ते तरी सांग. आता मी तुला तुझ्या निष्ठुरपणाचीच शपथ घालते माझ्यावर असा अन्याय करू नकोस.


‘गैरो थिरकते शानेपर,
ये हाथ गंवारा कैसे करे,
हर बात गंवारा हैं लेकीन,
ये बात गंवारा कैसे करे?
तुझको तेरी बेदर्दीकी कसम,
ये जाने वफा ये जुल्म न कर.’
प्रिया, हे आठवून बघ ना की कधी तुझेही माझ्यावर प्रेम होते. हवे तर आज तू ते मान्यही करू नकोस. तू माझ्या हृदयाला कितीही जखमा केल्या तरी चालतील. पण असे परक्या कुणाशी मिळून माझ्या हृदयात खंजीर खुपसू नकोस. मला या कल्पनेनेच मृत्यू येईल. कृपा करून माझा हा छळ थांबव. अगतिक प्रेमिकेचे हे आर्जवी निवेदन साहिरने किती हळुवारपणे मांडले ते पाहणे लोभस आहे-


‘हम भी थे तेरे मंजूर-ए-नजर,
दिल चाहे तो अब इकरार न कर.
सौ तीर चला सीनेपे मगर,
बेगानोंसे मिलकर वार न कर.
बेमौत कही मर जाये ना हम.
ए जाने वफा ये जुल्म न कर.’
मीनाक्षीच्या भाबड्या ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ची बाजू मांडणाऱ्या साहिरच्या एकापेक्षा एक अर्थपूर्ण ओळी आणि रवीचे संगीत श्रोत्याला हळवे करून टाकतेच. जुन्या ‘ओल्ड-फॅशन’ प्रेमाची गोष्टच काही और होती. आजच्या ‘तू नही तो और सही, और नही तो और सही’च्या उथळ काळात साहिरचे हे प्रेमाने ओथंबलेले शब्द म्हणजे अनमोल ठेवा आहे. एकेकाळी एक अतिशय प्रामाणिक भावना असलेल्या प्रेमाबद्दलचा भ्रम जपलाच पाहिजे.

Comments
Add Comment

अफजलखान वध : इतिहासातील सोनेरी पान

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने सागरी सुरक्षा व्यवस्थेच्या

लिटिल मास्टर सुनील गावसकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर सुनील मनोहर गावसकर. वेंगुर्ले उभादांडा हे त्यांचे गाव. क्रिकेटच्या इतिहासात कधीही न

हम्पी म्हणजे : दगडात कोरलेली विजयनगर साम्राज्याची वैभवगाथा

विशेष : लता गुठे आपण देश-विदेशात फिरत राहतो तेव्हा अनेक शहरं आपल्याला आवडतात पण नजरेत भरणारं आणि मनात कायम

आखिरी गीत मोहब्बतका सुना लूं तो चलूं

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे नोव्हेंबर महिन्यातला सोमवार आला तो एक अतिशय वाईट बातमी घेऊनच. आठच दिवसांपूर्वी

उर्वशी-पुरुरवाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे इंद्राच्या दरबारात अनेक सुंदर अप्सरा होत्या. त्या नेहमीच चिरतरुण असल्याचे

मालकाचे घर, दादागिरी भाडोत्रीची

क्राइम : अॅड. रिया करंजकर शहरामध्ये नोकरीची आणि उद्योगधंद्याची मुबलकता असल्यामुळे ग्रामीण भागातील युवक शहराकडे