रायगड जिल्ह्यातील जुने पूल होणार इतिहासजमा

ब्रिटीशकालीन पूल, धोकादायक बांधकामे होणार जमीनदोस्त


अलिबाग : अतिवृष्टीच्या काळात रायगड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने त्यावर उपाय म्हणून अनेक लहान-मोठे पूल बांधून दळणवळण सुरळीत करण्याचा प्रयत्न ब्रिटिश राजवटीपासून करण्यात येत आहे; परंतु शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी बांधलेले जिल्ह्यातील बहुतांश पूल आता नादुरुस्त आणि कमकुवत झाले आहेत. त्यामुळे इतिहासाची साक्ष असलेले हे पूल आता पाडण्यात
येत आहेत.


कोकणात पावसाळ्यातही दळणवळणास सोयीचे ठरावे यासाठी दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी बांधलेले पूल अद्याप वापरात आहेत, परंतु स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १३३ पूल धोकादायक आढळले आहेत, तर राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे ६८ जुने पूल दुरुस्तीही होऊ न शकणारे आहेत. काळ्या दगडाचे मजबूत बांधकाम असले, तरी आधुनिक अभियांत्रिकतेच्या निकषात ते नादुरुस्त ठरतात. यांतील बहुतांश पुलांची उंची जमिनीपासून कमी आहे. काहींना कठडे नाहीत. पूर्वीच्या वाहनांच्या संख्येनुसार त्यांची रुंदी तीन ते चार मीटर इतकी आहे. काही साकव त्याहूनही रुंदीने कमी आहेत. सध्याच्या वाहनांच्या रहदारीस ही जुनी व्यवस्था कमी पडत आहे. त्याचबरोबर अनेक वर्षे पुराचा मारा सहन केलेले हे पूल कमकुवत झाले आहेत. असे अनेक जीर्ण पूल जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळतात. भुंडा पूल दीडशे वर्षांपूर्वी भोगावती नदीवर बांधण्यात आला होता. या पुलाला कठडा नव्हता. त्यामुळे त्यास स्थानिक लोक भुंडा पूल म्हणून ओळखत. भुंडा पूल जमिनीपासून कमी उंचीवर होता. त्यास पर्याय म्हणून पेणचे आमदार रवींद्र पाटील यांच्या प्रयत्नाने नवा पूल बांधण्यात आलेला आहे. पर्याय उपलब्ध झाल्यानंतर जुना भुंडा पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी हा पूल पाडण्यात आला.


दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेले रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १३३ पूल धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यांपैकी कोणता पूल कधी पडेल याची शाश्वती उरलेली नाही. यात लहान नद्यांवरील साकव पुलांची संख्या जास्त आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने बांधलेल्या या पुलांची दुरवस्था झालेली आहे. या सर्व पुलांच्या दुरुस्तीसाठी ९८ कोटी ५० लाख रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे रायगड जिल्हा परिषदेकडून पाठविलेला असला, तरी अद्याप सरकारकडून या पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीच न मिळाल्याने पुलांची कामे मार्गी लागू शकलेली नाहीत.


नागोठण्यातील शिवकालीन पूल नागोठण्याहून वरवठणे आणि रोह्याकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या अंबा नदीवरील शिवकालीन पुलाच्या कठड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शिवकालीन पुलाला अखेरची घरघर लागली असून, हा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवण्यासाठी येथील ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. हा पूल सुमारे ४५० ते ५०० वर्षांपूर्वीचा असून, आयपीसीएल (रिलायन्स) कंपनीच्या उभारणीच्या काळात नागोठण्यात अंबा नदीवर पर्यायी पूल उभारल्यानंतर या ऐतिहासिक पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. ऐतिहासिक ठेवा म्हणून हा पूल न पाडता पुलाची डागडुजी करावी, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे.


जुन्या बांधणीच्या पुलांची क्षमता संपलेली असल्याने त्यांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तरीही काही नागरिक त्याचा वापर करीत असतात. हे पूल कोसळून दुर्घटना होण्यापेक्षा त्यापूर्वीच ते पाडणे योग्य ठरेल.
- जगदीश सुखदवे, (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग)

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.