जीवनात झाड व्हा !

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


लहान मुलांना मोठी माणसे नेहमीच एक प्रश्न विचारतात. कोणता ते ओळख पाहू! तू मोठेपणी कोण होणार? तुला कोण व्हावेसे वाटते? दोन ते चार वयोगटातील मुलाला हा प्रश्न विचारला तर त्याच्या अवतीभवती वावरणाऱ्या माणसात रुबाब, आकर्षण व मान, अधिकार यापैकी काही अनुभवाने आढळल्यास तो चटकन म्हणेल, ‘‘मी बँडवाला होणार,’’ ‘‘मी मोटारवाला होणार”, ‘मी बाई होणार’, “ मी पोलीस मामा होणार” वगैरे, वगैरे. त्या अजाण वयात अशीच उत्तरे नकळत दिली जातात. थोडं मोठं झाल्यावर मी डॉक्टर होणार, मी बाई होणार अशी मुलं सांगतात. कारण काय ठाऊक आहे? तर म्हणतात, आई-बाबा म्हणतात म्हणून, आजोबांची इच्छा आहे म्हणून किंवा शाळेत शिक्षक सांगतात म्हणून !! म्हणजे आपल्याला नक्की कोण व्हावेसे वाटतं ते तसंच का वाटतं हे छोट्यांना नीट सांगता येत नाही. आठवा बरं, आपल्या शाळेतली वेशभूषा स्पर्धा. जास्तीत जास्त मुली बाई होत असतात आणि मुलं डॉक्टर.


मी मात्र तुम्हाला सांगेन की, जीवनात काहीही व्हायचं ठरवा, ते साध्य करण्यासाठी भरपूर प्रयत्न करा, कष्ट घ्या, सैनिक होऊन देश रक्षा करा, डॉक्टर होऊन जीव वाचवा, उद्योजक होऊन एखाद्याला काम द्या, समाजसेवक होऊन समाजहित करा, पण हे सारं करताना तुम्ही “जीवनात झाड व्हा” हा मंत्र ध्यानात ठेवा.


ऊन, पाऊस, वादळ, वारा, बदलते ऋतू, कडाडती वीज या साऱ्यांना हसतमुखाने सामोरे जात आव्हानं स्वीकारत, खंबीरपणे, ताठ, डौलात, स्थिर बुद्धीने उभे असलेले झाड किती परोपकारी संतांप्रमाणे असते बरे! त्याच्या जीवनाचा प्रत्येक भाग परहितार्थ श्रमत, कष्टत असतो. झाड आपल्याला थकलेल्या पांथस्थाना आश्रय देतं, छाया देतं, सुगंधीत फुलं, सुमधुर रसाळ फळ हे झाडच आपल्याला भरभरून देत राहतं. पक्षी झाडाच्या फांद्यांवर विसावा घेतात, बागडतात, आपली घरटी बांधून झाडाच्या आधाराने आश्रयाने गुण्यागोविंदानं राहतात. देता व्हाचा संदेश झाड आपल्याला देतं. संकटांना भिऊ नका, डगमगू नका, आपली जागा सोडू नका, कर्तव्यात कसूर न करता दक्ष राहा हेच जणू झाड आपल्या आचरणातून सांगतं, सुचवतं, दुःख पचवा, संकटं पेलून धरा, सुखात ताठा, गर्व नको असंच जणू हे झाड आपल्याला सांगतं.


आळसाने आडवं झालेलं झाड, निराशाने पळून जाणारं झाड तुम्ही कधी पाहिलं आहे का? नाही ना? म्हणूनच या झाडाचा आदर्श ठेवून आपण झाड व्हायला हवं. मानवाच्या आयुष्यात अनेक प्रतिकात्मक मार्गदर्शन करणारे घटक निसर्गात आहेत. त्यापैकी झाड हे एक अत्यंत सशक्त आणि प्रेरणादायी प्रतीक आहे. “जीवनात झाड व्हा” हा उपदेश आपण प्रत्यक्ष अनुभवावर आधारित घेतल्यास, तो आयुष्याला सकारात्मक दिशा देतो.



झाडाचे गुणधर्म - जीवनासाठी प्रेरणा


१. मूक सेवा आणि नि:स्वार्थ दान
झाड कधीही आपल्या फळांची जाहिरात करत नाही. ते गारवा देतं, सावली देतं, फळं देतं, ऑक्सिजन देतं - आणि हे सर्व नि:स्वार्थपणे.
उपदेश : आयुष्यात काही मिळवलं तरी त्याचा गर्व न करता, ते इतरांसाठी उपयोगी पद्धतीने वापरा.
२. मुळांवरचा विश्वास
झाड जितकं उंच जातं, तितकं त्याचं मुळांवरचं अवलंबित्व वाढतं.
उपदेश : माणसाने कितीही मोठं झालं, तरी आपली मुळे म्हणजे आपले संस्कार, कुटुंब, मातृभूमी, हे विसरू नयेत.
३. संकटातही उभं राहणं
वाऱ्याचे, पावसाचे, उन्हाचे वारे झेलूनही झाड ताठ उभं असतं.
उपदेश : संकटं आयुष्यात येणारच, पण त्यांच्यासमोर न झुकता, ठामपणे उभं राहणं हेच खऱ्या आयुष्याचं लक्षण.
४. दुसऱ्यांना आधार देणं
झाडाखाली माणसं बसतात, पशु-पक्षी विसावतात, प्रेमाने नांदतात.
उपदेश : आपणही असं झाड व्हावं, ज्याच्या सावलीत इतरांना आधार, शांती आणि प्रेरणा मिळते.
५. फळांनी झुकणं
झाडाला जितकी फळं लागतात, तितकं ते झुकतं - विनयाने.
उपदेश : ज्ञान, यश, श्रीमंती वाढली की नम्रता वाढावी, गर्व नव्हे.


झाड म्हणजे केवळ एक वनस्पती नाही, ती एक जीवनशैली आहे. झाड होणं म्हणजे-इतरांसाठी उपयुक्त होणं, संकटांना सामोरं जाणं, मुळाशी नातं जपणं, जीवनभर देत राहणं.


“जीवनात झाड व्हा” ही केवळ ओळ नाही, ती एक आचारधर्म आहे. आपण झाडासारखे जगलो, तर समाज, पर्यावरण आणि मानवी नाती अधिक समृद्ध होतील. फुला-फळांनी, गारव्याने, सेवाभावाने आपणही आयुष्याला अर्थ देऊ शकतो.


“फक्त सावली देणं हेच झाडपण नाही, तर दुसऱ्यांना उभं राहण्यासाठी मूळ बनणं हेही झाड होण्याचं खर सामर्थ्य आहे.” जीवनात झाड व्हा, हे आचारात दिसू द्या.

Comments
Add Comment

पोटपूजेचाही उत्सव!

खास बात : विष्णू मनोहर प्रसिद्ध बल्लवाचार्य दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे तसेच शरीर ऊर्जावान ठेवणाऱ्या

भारतासाठी नवी चिंता

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’नंतर भारत आणि पाकिस्तानच्या दिशा बदलल्या. पाकिस्तानने

अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म १४

अतिलाडाने तुम्ही मुलांना बिघडवत, तर नाही ना?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू पालक या नात्याने आपल्या मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू घेऊन द्यावी असं

‘अब ये सुहाना साथ ना छुटे...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सिनेमासाठी ‘गुमराह’ हे शीर्षक बी. आर. चोपडा, महेश भट आणि वर्धन केतकर या तीन

देवाची मदत...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर माझ्या लहानपणी मी वडिलांच्या तोंडून ऐकलेली एक गोष्ट सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते.