पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

  89

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम!


पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात ससे, घोरपड, लाहुरी, तितर यांसारख्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. कारण मांसाहार ‘उत्तम आरोग्यदायक’ आहे, असा एक गैरसमज समाजात खोलवर बसलेला आहे. पण खरंतर निसर्गाने याच पावसाळ्यात आपल्या तब्येतीसाठी एक सशक्त, पोषक आणि नैसर्गिक पर्याय दिलेला आहे. तो म्हणजे रानभाज्या.


रानात उगवणाऱ्या या भाज्या केवळ स्वादिष्टच नव्हेत, तर त्या औषधी गुणधर्मांनी भरलेल्या असतात. मधुमेह, कफ, खोकला, मूत्रविकार, त्वचाविकार यासारख्या आजारांवर काही रानभाज्या तर थेट रामबाण उपाय करतात.



काही खास रानभाज्या आणि त्यांचे गुणधर्म:


हादगा : हादगाच्या फुलांचे भजे आणि भाजी करतात. या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच्या खोडाची साल, पाने व मूळ औषधात वापरले जाते. अनार्तवांत फुलांची भाजी उपयुक्त आहे. फुफ्फुस सुजून ज्वर, कफ ही चिन्हे दिसल्यास हादग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानातून किंवा तिचा अंगरस मधाबरोबर देतात, त्यानंतर घाम येतो व कफ पडायला मदत होते.


दोडी : दोडीची फुले ही वेलवर्गीय रानभाजी आहे. दोडी किंवा जिवती या वनस्पतीचे आयुर्वेदिक महत्त्व आहे. ही वनस्पती ज्या महिलांना श्वेतप्रदराचा त्रास आहे, त्यांनी ही भाजी १५ ते २० दिवस सेवन केल्यास आराम मिळतो.


कटुर्ती : या भाजीला 'रानकारली' असेही म्हणतात. खडकाळ परिसरात ही रानभाजी आढळते. कार्टुलीच्या वेलीची पाने, फुले व फळेही कारल्यासारखीच असतात. फळे कारल्यापेक्षा छोट्या आकाराची असतात. कटुर्ती कारल्यासारखी कडवट नसते. याची भाजी छान रुचकर लागते. ही भाजी मूत्रविकारांवर गुणकारी आहे.


कुलू : कुलूची भाजी पावसाळ्यात पहिली सर बरसल्यापासून कुलूची भाजी जंगलात दिसू लागते. कुलूची भाजी काही दिवसांतच तयार होते. या भाजीला फोडशी/कुलू किंवा काल्ला या नावाने ओळखले जाते. कुलूची भाजी एक प्रकारचे गवतच असते.


कुरडू : कुरडूची भाजी कुरडूची कोवळी पाने शिजवून ही भाजी केली जाते. वृद्ध माणसांचा कफविकार, जुना खोकला यासाठी ही भाजी गुणकारी आहे. कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवीला साफ करायला मदत करते. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. कुरडूच्या बिया मूतखडा आजारासाठी उपयुक्त ठरतात.


अळू : अळूच्या कांद्यापासून ही भाजी उगवते. पानांमुळे हाताला खाज सुटते, त्यामुळे हाताला थोडे तेल लावून आळूची पाने हाताळावी. अळूच्या पानांपासून अळूची पातळ भाजी (अळूचं फतफतं) तसेच अळूच्या पानांची वडीही करतात.


भुईआवळी : ही भाजी आंबट असून, आधुनिक शास्त्रानुसार या वनस्पतीचा उपयोग विषाणूजन्य तापात केला जातो. यकृतातील पाचक स्रावामध्ये बिघाड झाल्यास हिपॅटायटिस-व, काविळीमध्ये या भाजीचा चांगला उपयोग असल्याचे दिसून आले आहे. रक्तदाबवृद्धी, चक्कर येणे या आजारात ही भाजी खाल्ल्याने सुधारणा आढळून येते.


टाकळा : तरोटा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव 'कॅशिया टोरा' आहे. हिच्या कोवळ्या पानाची भाजी करतात. ती पौष्टिक व वातनाशक असते. प्रसूतीनंतर तरोट्याची भाजी करून ती स्त्रियांना खायला देतात.


अंबाडी : ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या फुलांची, पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यापासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.


तांदुळजा : ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. शरीरात सी जीवनसत्त्व मिळावे, यासाठी तांदुळजाची भाजी खावी. मधुरस्साच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य अशी ही भाजी आहे. उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर, कांजण्यात ही फार उपयुक्त आहे. विषविकारी, नेत्रविकारी, पित्तविकारी, मूळव्याध, यकृत, पाथारी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करण्यासाठी तांदुळजाची भाजी फार उपयुक्त आहे.


मायाळू : ही एक वेलवर्गीय रानभाजी आहे. या भाजीच्या पानांचे भजे केले जातात. ही भाजी मूळव्याधीवरही उपयोगी आहे. मायाळू पित्तशामक असून, त्वचारोग, आमांश, व्रण यावर उपयोगी आहे.



काय लक्षात ठेवायचं?


रानभाज्या उपयुक्त असल्या तरी अति सेवन टाळा. योग्य माहिती घेतल्याशिवाय कोणतीही भाजी खाऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात. प्रत्येक भाजीचा आपला एक औषधी उपयोग असतो, म्हणून गरजेनुसारच आणि समजून उमजून त्या आहारात घ्या.


पावसात फक्त चटपटीत तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा शरीराला पोषण देणाऱ्या रानभाज्यांकडे वळा. निसर्गाने भरभरून दिलेल्या या भाज्या आरोग्याची चव आणि शक्ति दोन्ही देतात. या वर्षी पावसाळा ठेवा मांसाहारमुक्त, आणि मिळवा रानभाज्यांतून शुद्ध पोषणाचा आहार.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या