Sunday, October 26, 2025
Happy Diwali

शहापुरातील डोळखांब परिसरात बिबट्याचा वावर

शहापुरातील डोळखांब परिसरात बिबट्याचा वावर

शहापुर: शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीत डेहणे आज्या डोंगररांगा परिसरात साकुर्लीच्या ग्रामस्थांना बिबटयाचे दर्शन झाल्याने जंगल परिसरात फिरताना नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्राचे भौगोलीक क्षेत्रफळ १० हजार ५०० हेक्टरपर्यंत विस्तारले असून, ठाणे व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत घनदाट राखीव वनक्षेत्र आहे. या डेहणे गाव हद्दीत आज्या डोंगररांगांमध्ये रामायणकार वाल्मीक ऋषींच्या समाधीचे स्थळ, लव-कुश यांच्या पाळण्याचे ठिकाण असल्याचे सांगण्यात येते. अनेक पर्यटक, भक्तगणांची या भागात नियमित वर्दळ असते.

डोळखांब वन विभागाचे अधिकारी नेहमीप्रमाणे गुंडे, डेहणे भागात वन परिक्षेत्रात गस्त घालत होते. त्यांना या भागात वन विभागाकडून लावण्यात आलेल्या जंगली प्राणी खेचक (ट्रॅप) कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याच्या हालचाली दिसून आल्या. गुंडे, डेहणे हद्दीत बिबट्याचा संचार असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी तातडीने डोळखांब वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांना दिली.

या वर्षी अवकाळी पडलेल्या पावसाने जंगलात शेवळी,तेलपाट, कुर्डू, कंदमुळे, रानभाज्या उगवल्या असून, अनेक महिला, नागरिक ती आणण्यासाठी जंगलात जात असतात. शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू झाली आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांची शेती जंगल भागात आहे. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन दिवसा जंगल भागात चरायला नेले जाते.

या सर्व बाबींचा विचार करून डोळखांब वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डोळखांब परिसरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, गाव पाडे हद्दीत बिबट्यापासून सावध राहण्याचे फलक लावले आहेत. गाव, आदिवासी पाड्यांमध्ये वन कर्मचारी जाऊन ग्रामस्थांना एकत्रित करून बिबट्याचा वावर परिसरात असल्याने घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती ग्रामस्थांना देत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा