जिल्ह्यातील शेतीक्षेत्राला वाढत्या औद्योगिकीकरणाचा फटका

उरण, पनवेल, खालापूर, पेण, अलिबाग तालुक्यांत मोठी घट


अलिबाग : रायगड जिल्हा हा पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उद्योग प्रधान रायगड जिल्ह्यात शेतीक्षेत्र ४० हजार हेक्टरने घटले आहे. जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र केवळ ८५ हजार हेक्टरवर आले असून, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जमिनींवर विपरित परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
खरीप हंगामात याआधी एक लाख २४ हजार हेक्टरवर पूर्वी भात पिकाची, तर १५ हजार हेक्टरवर नाचणीची लागवड केली जात असे, मात्र आता लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाली आहे. भात लागवडीचे क्षेत्र ९५ हजार ६४५ हेक्टरवर आले आहे, तर नाचणीचे क्षेत्र २ हजार ८११ हेक्टरपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच गेल्या काही वर्षांत चाळीस हजारहून अधिक हेक्टर लागवडीखालील क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा, ही ओळख आता पुसली जाऊ लागली आहे.


जिल्ह्याची खरीप आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालात यावर्षी ८१ हजार ३३५ हेक्टरवर भात पिकाची, तर २ हजार ५५० हेक्टरवर नाचणी पिकाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावरूनच लागवडीखालील क्षेत्रात आणखीन घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी शेतीपासून दुरावत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. उरण, पनवेल, खालापूर, पेण, अलिबाग या तालुक्यांत लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट होत आहे.


वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न याचा एकत्रित परिणाम जिल्ह्यातील शेतीवर होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी शेतीपासून दुरावले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण होत आहे. त्यामुळे शेतजमिनी उद्योगांच्या नावाखाली संपादित केल्या जात आहेत. सेझ, नवी मुंबई विमानतळ, दिल्ली-मुंबई कॉरिडॉर, जेएनपीटी, टाटा पॉवर यांसारख्या प्रकल्पांसाठी सध्या भूसंपादन सुरू असल्याने शेती क्षेत्रात घट होण्याचे हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय खासगी औद्योगिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन सुरू आहे. अलिबाग तालुक्यात टाटा पॉवरसाठी, रिलायन्स आणि जेएसडब्ल्यू कंपन्यांसाठी पेण तालुक्यात जागा खरेदी करण्यात आल्या आहेत. सिडकोच्या माध्यमातून अलिबाग, रोहा आणि मुरुड तालुक्यांतील ४४ गावांत एकात्मिक औद्योगिक विकास प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी १९ हजार हेक्टर शेतजमिनी संपादित करण्याचे नियोजन आहे.



खारभूमी विभागाची उदासीनता


याशिवाय खारभूमी विभागाची उदासीनता शेतीच्या मुळावर आली आहे. जिल्ह्यात खारभूमी क्षेत्रात येणारे ३१ हजार २९६ हेक्टर क्षेत्र आहे. यातील अलिबाग तालुक्यातील ३ हजार १६ हेक्टर क्षेत्र खाड्यांमधील उधाणाचे पाणी शिरून कायमचे नापीक झाले आहे. माणकुळे, बहिरीचा पाडा, हाशिवरे, कावाडे, सोनकोठा, रांजणखार डावली, मेढेखार, देहेन या गावांमधील जमिनींची कांदळवने झाली आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून शेतजमिनींचे संरक्षण व्हावे, यासाठी कोकणात खाडी आणि समुद्रकिनाऱ्यांवर खारबंदिस्ती घातली जाते. याची खारभूमी विभागाकडून योग्य देखभाल दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे बंधारे फुटून खारेपाणी शेतात शिरते आणि या जमिनी नापीक होत जातात. कालांतराने या जमिनींवर कांदळवने उगवत आहेत.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या