मुंबई : आयपीएल २०२५ मधील क्वालिफायर २ मध्ये पराभव झाल्यामुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात आले. आता मंगळवार ३ जून २०२५ रोजी अहमदाबादच्या मोदी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून या सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. मुंबईचे आव्हान संपल्यामुळे मुंबई इंडियन्सचे समर्थक दुःखात आहेत. पण मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन आनंदात आहे. मुंबई इंडियन्सच्या मालकीण असलेल्या नीता अंबानी संघ क्वालिफायर २ खेळल्यामुळे मालामाल झाल्या आहेत.
आयपीएलचे बिझनेस मॉडेल असे आहे की सामना जिंकला काय किंवा हरला काय संघ व्यवस्थापनाची कमाई ही हमखास होते. फक्त संघाच्या लोकप्रियतेवर कमाई किती जास्त असणार हे अवलंबून असते. यासाठीच कामगिरीत सातत्य असणे आणि संघ जास्तीत जास्त सामने जिंकणे आवश्यक असते. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच आयपीएल जिंकल्या आहेत. तसेच अनेक आयपीएल सीझनमध्ये मुंबईने लक्षवेधी कामगिरी केली आहे. यामुळे मुंबई इंडियन्स हा एक लोकप्रिय संघ आहे. या लोकप्रियतेचा फायदा मुंबई इंडियन्सच्या मालकीण असलेल्या नीता अंबानी यांना झाला आहे.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये प्रत्येक संघासाठी म्हणून एक घरचे मैदान अर्थात होमग्राउंड निश्चित केले जाते. या स्टेडियममधील मॅचच्या आयोजनाचे खर्च संघ व्यवस्थापन करते. सुरक्षेसाठी अथवा निसर्गाच्या प्रतिकूलतेमुळे ठिकाण बदलले तरी साखळी फेरीत अर्थात लीग राउंडमध्ये प्रत्येक सामन्याच्या आयोजनाची जबाबदारी त्या सामन्यात खेळणाऱ्या दोन पैकी एका संघाच्या व्यवस्थापनाकडेच दिलेली असते. या बदल्यात तिकीट विक्रीच्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न यजमान संघ व्यवस्थापनाला अर्थात संघाच्या मालकाला मिळते. या व्यतिरिक्त संघाच्या सर्व पुरस्कर्त्यांकडून (स्पॉन्सरर) मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा संघ व्यवस्थापनाला अर्थात संघाच्या मालकाला मिळतो. संघाच्या जर्सीवर दिसणाऱ्या ब्रँडच्या स्पॉन्सरशिप आणि मीडिया हक्कांमधूनही संघ व्यवस्थापनाला अर्थात संघाच्या मालकाला मोठी रक्कम मिळते.
होमग्राउंड ऐवजी त्रयस्थ ठिकाणी सामना झाला तर दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाला तिकीट विक्रीच्या एकूण उत्पन्नापैकी प्रत्येकी ४० टक्के उत्पन्नाचे वाटप केले जाते. ही परिस्थिती लीग मॅच अर्थात साखळी सामन्यांनंतरच निर्माण होण्याची शक्यता असते. मुंबई आणि अहमदाबाद यांच्यात झालेली क्वालिफायर २ ही मॅच अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर झाली. ही मॅच बघण्यासाठी स्टेडियमवर एक लाख पस्तीस हजार प्रेक्षक आले होते. आयपीएलच्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये वेगवेगळ्या जागांसाठी वेगवेगळ्या दराची तिकिटे आहेत. साधारण तीन हजार ते तीस हजार रुपयांपर्यंतच्या दराची तिकीटे असतात. हिशोबासाठी तिकिटाची किंमत तीन हजार रुपये आणि प्रेक्षकसंख्या एक लाख असा विचार केला तरी तिकिटांच्या विक्रीतून तीस कोटी रुपयांचे उत्पन्न होते. क्वालिफायर २ ही जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर झाली. यामुळे संघ व्यवस्थापनांना तिकिटांच्या विक्रीतूनच कोट्यवधी रुपयांची कमाई झाली. याशिवाय स्पॉन्सरशिप, मर्चंडायझिंग (संघाचे लोगो असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची विक्री), मीडिया राइट्स अशा विविध मार्गाने कोट्यवधी रुपयांची कमाई ही होतेच. यामुळे मुंबई इंडियन्स क्वालिफाय २ मध्ये हरली तरी मुंबई इंडियन्सची मालकीण नीता अंबानी मालामाल झाली आहे.