राजची फजिती

  65

कथा : रमेश तांबे


राजच्या शाळेला सुट्टी पडली होती. तो चांगल्या गुणांनी पासदेखील झाला होता. मे महिन्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरायला जायचं म्हणून तो हट्ट धरून बसला होता. पण आई-बाबा नंतर बघू आता नाही असे म्हणत होते. राजच्या दादाला क्रिकेटचं भारी वेड. त्यामुळे दिवसभर टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघणे एवढेच त्याला काम होते. आईची घरातली कामे काही संपत नव्हती. राज घरात बसून कंटाळला होता. कुणालाच आपल्यासाठी वेळ नाही म्हणून तो हिरमुसला होता. आता दिवसभर घरात बसून काय करायचं? याचाच विचार राज करीत बसला होता.


तेवढ्यात मित्र श्यामची त्याला आठवण झाली. त्याने लगेचच श्यामला फोन लावला. “अरे श्याम काय करतोस? चल कुठेतरी फिरून येऊ!” राज असे म्हणताच श्याम म्हणाला, “अरे चल, मीही कंटाळलो आहे बघ घरात बसून!” मग आपला मोबाइल मुद्दामच घरात ठेवून राज बाहेर पडला. पाच मिनिटांतच एका चौकात राज आणि श्याम एकमेकांना भेटले. राज म्हणाला, “अरे श्याम बरं झालं तू आलास. नाहीतर मला घरातच बसून राहावं लागलं असतं. बघ ना आपल्यासाठी घरात कुणालाच वेळ नाही!” मग श्याम म्हणाला, “राणीच्या बागेत जाऊया!” राणीच्या बागेचं नाव ऐकताच राजची कळी खुलली. मग बस पकडून दोघेही राणीच्या बागेत पोहोचले. तिथे भरपूर गर्दी होती. अनेक लहान मुले आपल्या आई-बाबांबरोबर जंगली प्राणी पाहायला, मजा करायला आले होते. त्यांना पाहून राजला आपल्या आई-बाबांची आठवण झाली अन् त्याच्या चेहऱ्यावर एक नापसंतीची रेषा उमटली. वाघ, सिंह, हत्ती, हरणे, माकडे, विविध प्रकारचे पक्षी, बर्फातले पेंग्विन त्यांनी पाहिले. खूप आनंद लुटला. नंतर दोघे गिरगाव चौपाटीवर आले. समुद्राच्या पाण्यात भिजले, तिथल्या वाळूत खेळले, चौपाटीवरची भेळपुरी खाल्ली, आवडत्या आइस्क्रीमचा आस्वाद घेतला. तिथे बराच वेळ दोघांनी मजा केली. खूप आनंद घेतला. सूर्य समुद्रात बुुडण्याच्या तयारीत होता. आता घरी जायला हवे असे राजला वाटू लागले. आपण कुठे चाललो ते घरी सांगितले नाही. जवळ मोबाइल ठेेवला नाही, आई घाबरली असेल. बाबा पोलिसात तक्रार करायला गेले असतील. दादा टीव्ही बंद करून मला शोधायला बाहेर पडला असेल. हे सारे आठवून राजला एक प्रकारचा आनंदच होत होता. मी घरात कुणालाच नको आहे. माझ्यासाठी कुणालाही वेळ नाही. मग बसा आता रडत. राजच्या डोक्यात विचार सुरू होते. तेवढ्यात श्यामने टॅक्सीला हात केला. दोघेही टॅक्सीमध्ये बसले. समुद्रात बांधलेल्या नव्या रस्त्यावरून गाडी वेगाने धावू लागली. पंधरा मिनिटांतच राजचे घर जवळ आले. राजने गाडी थांबवण्याची खूण केली. तरीपण तो टॅक्सीवाला गाडी थांबवेना. तो आणखीनच वेगाने गाडी पळवू लागला. आता मात्र राज घाबरला. तेवढ्यात श्यामने ड्रायव्हरच्या डोक्यात एक बुक्की मारली. पण ड्रायव्हरने मारलेल्या एका थापडीतच श्यामची शुद्ध हरपली अन् तो सीटवर पडला. आता राज चांगलाच घाबरला. तो रडू लागला. जोरजोरात ओरडू लागला. आता तर तो ड्रायव्हरचे केस जोराने ओढू लागला.


तोच कुणीतरी राजच्या पाठीत जोराचा धपाटा लागावला. “अरे राज, माझे केस का ओढतो आहेस आणि रडतोयस का?” आई रागाने म्हणाली. पाठीत बसलेल्या धपाट्यामुळे राजला जाग आली. बघतो तर काय! तो आई शेजारीच झोपला होता. आई त्याच्या मुठीतले केस सोडवत, रागाने त्याच्याकडे बघत होती. तेव्हा राजच्या लक्षात आले की अरेच्चा! आपण तर घरातच झोपलोय आईच्या शेजारी. अन् आपण बघितलेले ते एक स्वप्नच होते. मग काय राज हिरमुसून पुन्हा झोपला. बराच वेळ विचार करीत लोळत पडला की, आपल्याला असे कसे स्वप्न पडले!

Comments
Add Comment

पाऊस

कथा : रमेश तांबे एकदा काय झाले काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरून आले वारा सुटला सोसाट्याचा उडवत पाचोळा

झोप

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शरीर तसेच मनाच्या विश्रांतीची ‘झोप’ ही नैसर्गिक अवस्था असते. झोप आपल्या शरीराला

उपयुक्तता व सौंदर्य एकाच नाण्याच्या दोन बाजू

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर आजच्या जगात आपल्याला काय आढळते. माणसे ही सौंदर्याच्या मागे लागलेली

स्व-जाणीव

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर जोमनुष्य स्वतःला व स्वतःच्या शक्तीला ओळखतो त्याला जीवनात सर्व काही

तुझ्या हाताच्या चवीचं...

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ बाबा सरकारी नोकरीत सुपरिटेंडंट होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात

हत्ती

कथा : रमेश तांबे एक होता हत्ती त्याच्या अंगात फार मस्ती इकडे तिकडे धावायचा पायाखाली येईल त्याला चिरडायचा. हत्ती