गुजराथ विद्यापीठाचे माजी कुलगुरू काकासाहेब कालेलकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर


सुप्रसिद्ध गांधीवादी गुजराती साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रेय बालकृष्ण कालेलकर असले, तरी ते काका कालेलकर या नावानेच विशेष प्रसिद्ध आहेत. दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, ऊर्फ काकासाहेब कालेलकर हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक, इतिहासकर, शिक्षण तज्ज्ञ, पत्रकार, साहित्यिक तसंच भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक तथा गांधीवादी म्हणून परिचित आहेत. काकासाहेब कालेलकरांचा जन्म १ डिसेंबर १८८५ साली साताऱ्यास झाला. कालेलकर घराणे मुळचे सावंतवाडी जवळील कालेली गावचे. फर्ग्युसन महाविद्यालयातून ते १९०७ मध्ये बी.ए. झाले आणि एल.एल.बी.चे पहिले वर्ष पूर्ण केले. फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांनी राष्ट्रमत या दैनिकात संपादकीय विभागात काम केलं. त्यानंतर बडोदा येथील गंगाधर विद्यालयात कालेलकर शिक्षक म्हणून रुजू झाले, पण या विद्यालयात ‘सरकार विरोधी कारवाया चालतात’ असे कारण दाखवून ब्रिटिश सरकारने हे विद्यालय बळजबरीने बंद केले.


गंगाधर विद्यालय बंद झाल्यावर काकासाहेब महात्मा गांधीजींच्या गुजराथ येथील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी सर्वोदय या महात्मा गांधीजींच्या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी मोलाचे योगदान बजावले, त्यासाठी हिंदुस्थानी प्रचार सभेच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवला. भारत देशाचं ऐक्य टिकून राहण्यासाठी हिंदी भाषेच्या प्रचाराची नितांत आवशक्यता असल्याचे ते मानत, त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमणही केले. त्यांच्या मनावर आधी सावरकरांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव, पण पुढे महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा संस्कार होऊन ते पूर्णपणे गांधीवादी झाले. १९१७ साली ते अहमदाबादच्या गांधीजींच्या साबरमती आश्रमात गेले. १९३७ मध्ये ते वर्धा-सेवाग्रामला आले. गांधीजींच्या नवजीवन साप्ताहिकात ते लिहीत. गुजराती भाषा आत्मसात करून ते गुजरातीमधले नामवंत साहित्यिक झाले.


स्वातंत्र्याच्या आंदोलनात सतत भाग घेऊन त्यांनी बरेचदा कारावास सोसला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची दोन वेळा राज्यसभेत नियुक्ती झाली. अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले. गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष तसेच हिंदी विश्वकोश समितीचे ते सदस्य होते. त्यांना भारत सरकारची ‘पद्मविभूषण’, ‘साहित्य अकादमी’चे पारितोषिक व फेलोशिप असे बहुमानही मिळाले. त्याशिवाय अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य अशी ‘डी.लिट.’ची पदवीही अर्पण केली. त्यांना प्रवासाची विलक्षण हौस होती. हिमालय, ब्रह्मदेश, जपान, पूर्व आफ्रिका आणि संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला आणि गुजराती भाषेत त्या प्रवासांची रसाळ आणि काव्यात्म वर्णने करून गुजराती साहित्यात प्रवास वर्णनांचे दालन समृद्ध केले. गुजराती भाषेतला पहिला शब्दकोश ‘जोडणी-कोश’ त्यांनीच तयार केला. तुरुंगात असतानाच त्यांनी उत्तरेकडील भिंती नावाचे पुस्तक लिहिले.


त्याशिवाय हिंडलग्याचा प्रसाद, वनशोभा, खेळकर पाने ही ललितगद्यपर पुस्तके लिहिली. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’चा प्रभाव त्यांच्या मनावर होता व त्यातूनच ‘रवींद्रमनन’सारखे पुस्तक निर्माण झाले. विष्णुभट गोडसे ह्यांचे माझा प्रवास’(१८५७ सालच्या बंडाची हकिकत) हे प्रवासाच्या हौसेमधूनच त्यांनी वाचले. ते वाचल्यावर त्यांना ते काल्पनिक पुस्तक -कादंबरी आहे, असे वाटले आणि त्यांनी इतिहासाचार्य चिं. वि. वैद्य ह्यांना पत्र लिहून तसे विचारले. ह्याचे कारण त्या पुस्तकाची भाषा हेही होते. त्यांच्या प्रवास वर्णनांची मराठीत भाषांतरे झाली व मराठी साहित्यात भाषांतरित प्रवास वर्णनांचे दालन खुले झाले. कालेलकरांची आमच्या देशाचे दर्शन अनुवाद : वामन चोरघडे, ब्रह्मदेशचा प्रवास अनुवाद : श्रीपाद जोशी, भक्तिकुसुमे अनुवाद : वामन चोरघडे ‘लाटांचे तांडव’ अनुवाद : वामन चोरघडे ही प्रवास वर्णने मराठीत आली. लोकमाता भारतातील नद्यांचे वर्णनही मराठीत आले होते. लेखक सतत लिहिता राहावा, हे कालेलकरांच्या संदर्भात सत्य ठरते.


महात्मा गांधीजींच्या प्रेरणेमुळे साकारलेल्या गुजराथ विद्यापीठाच्या स्थापनेत काकासाहेब कालेलकरांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. काही काळ कालेलकर गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरूही होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे १९५३ साली “मागासवर्गीय आयोग” नेमण्यात आला होता, काकासाहेब कालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते. १९५५ ला या आयोगाने आपला अहवाल सरकारला केला. या अहवालात दलित तसंच अस्पृश्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती.


काकासाहेब कालेलकरांनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती जनतेने सुद्धा त्यांच्यावर भरभरून प्रेम केले, कालेलकरांना गुजराती लोक आदराने “सवाई गुजराती” म्हणत असत. काकासाहेब कालेलकरांनी लेखन आणि शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने १९६४ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले, तर कालेलकरांच्या साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामासाठी १९६६ साली “जीवन व्यवस्था” या गुजराती भाषेतील निबंध संग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. तर १९७१ साली “साहित्य अकादमीचे सदस्यत्व”ही बहाल करण्यात आले. २१ ऑगस्ट १९८१ साली वयाच्या ९६ व्या वर्षी काकासाहेब कालेलकरांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काकासाहेब कालेलकरांना ९६ वर्षांचे टिळक-आगरकरांच्या कालखंडापासून इंदिरा गांधींच्या कारकिर्दीच्या अनुभवापर्यंत प्रदीर्घ आयुष्य लाभले.

Comments
Add Comment

अफजलखान वध : इतिहासातील सोनेरी पान

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने सागरी सुरक्षा व्यवस्थेच्या

लिटिल मास्टर सुनील गावसकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर सुनील मनोहर गावसकर. वेंगुर्ले उभादांडा हे त्यांचे गाव. क्रिकेटच्या इतिहासात कधीही न

हम्पी म्हणजे : दगडात कोरलेली विजयनगर साम्राज्याची वैभवगाथा

विशेष : लता गुठे आपण देश-विदेशात फिरत राहतो तेव्हा अनेक शहरं आपल्याला आवडतात पण नजरेत भरणारं आणि मनात कायम

आखिरी गीत मोहब्बतका सुना लूं तो चलूं

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे नोव्हेंबर महिन्यातला सोमवार आला तो एक अतिशय वाईट बातमी घेऊनच. आठच दिवसांपूर्वी

उर्वशी-पुरुरवाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे इंद्राच्या दरबारात अनेक सुंदर अप्सरा होत्या. त्या नेहमीच चिरतरुण असल्याचे

मालकाचे घर, दादागिरी भाडोत्रीची

क्राइम : अॅड. रिया करंजकर शहरामध्ये नोकरीची आणि उद्योगधंद्याची मुबलकता असल्यामुळे ग्रामीण भागातील युवक शहराकडे