लालपरी आजही तरुणच...

  50

संदीप यशवंत मोने:सेवानिवृत्त एसटी कर्मचारी, पेण


एक जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली एसटी 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेऊन धावली. या दिवसाला आज ७८ वर्षे पूर्ण होत असून सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच एसटी गाड्या होत्या. एवढ्या वर्षानंतर हाच आकडा सुमारे १५ हजारांहून अधिक झाला. यामधून ५५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. अशा या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचा आज ७८ वा वर्धापन दिन आहे. एसटीच्या प्रवासी सेवेला जरी ७८ वर्षे पूर्ण झाली असली तरी लालपरी आजही तरुणच आहे. कारण आजच्या इंटरनेटच्या युगात एसटीनेही हा बदल स्वीकारून आज युपीआय पेमेंटवरून आपल्या तिकिटाचे पैसे देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.


स्मार्टकार्डद्वारे पासेसची सुविधा सुद्धा आहे. व्ही टी एस प्रणालीचा अवलंब करून वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. जर एखादा वाहन चालक बेदरकारपणे अति वेगाने वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याशी त्वरित संपर्क साधून वाहनांची गती नियंत्रणात आणून प्रवाशांची सुरक्षितता निश्चित केली जाते. आधुनिकतेचा साज एसटीने परिधान केला असून शिवशाही, शिवनेरी यासारख्या वातानुकूलित वाहनांची सेवा देण्यात येत आहे. यांसह प्रदूषणावर मात करण्याकरिता इलेक्ट्रिक वाहने सुरू करण्यात आली आहेत. सामाजिक बांधिलकी एसटीने कायम जपली असून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत, ७५ वर्षावरीलजेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, विद्यार्थी व अपंगांसह एकूण सुमारे ४३ योजनांच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट दरात सवलती देण्यात येतात. विविध यात्रा, सोहळे, ऐतिहासिक दिवसांच्या निमित्ताने एसटीच्या शेकडो गाड्या प्रवासाकरिता सज्ज असतात.


कोरोना काळात एसटीने दिला मुंबईकरांना मदतीचा हात.. कोरोनाची जागतिक महामारी आली असताना मुंबईची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएसटी चे अनेक कर्मचारी आजारी होते यावेळेस एसटीचे चालक, वाहक त्यांच्या मदतीला धावून गेले व मुंबईकरांना दिलासा मिळाला. तसेच राज्य शासनाने मान्यता दिलेल्या हजारो परप्रांतीय प्रवाशांना त्यांच्या निर्धारित रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याचे काम एसटीने केले. याच कोरोना काळात एसटी कार्गोच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा समाजातील तळागाळापर्यंत पुरवठा करण्याचे काम एसटीने केले. परंतु तीच कार्गो सेवा व काही ठिकाणची पार्सल सेवा बंद असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.


एसटीच्या जडणघडणीत तत्कालीन सर्वच महामंडळ अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, संचालक, अधिकाऱ्यांचे, सर्वच आजी-माजी कर्मचाऱ्यांचे व कामगार संघटना नेत्यांचे मोलाचे योगदान विसरून चालणार नाही म्हणूनच कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, भाऊ फाटक, विसू भाऊ परब, महामंडळ संचालक यशवंत मोने, तसेच अधिकारी वर्गापैकी ग. मा. चव्हाण, वि. भा. थोरात, जी. जी. फडके, एम. जी. फडतरे, ए. एन. ओगले, एस. एम. जगताप यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. वामन जोग, विजया कुडव, राजन पांचाळ, शिल्पा काकडे यांच्यासारखे नाट्य क्षेत्रातील नामवंत कलाकारही एसटीने दिले आहेत. महामंडळाचे उत्पन्न कितीही कमी जास्त असले तरी शेवटच्या प्रवाशाला किफायतशीर व सुरक्षित प्रवास देण्याकरिता एसटी सज्ज आहे. त्यामुळेच या आपल्या लालपरीची घोडदौड शतकोत्तर व्हावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर

वाहनांवर काटेकोर लक्ष रायगड : गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात.

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या