Friday, October 24, 2025
Happy Diwali

उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी

उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी

नागरिकांना सर्तकतेचा इशारा

बदलापूर : आधी उन्हाच्या झळांनी असह्य केले आणि आता ऐन उन्हाळ्यात बदलापूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून जनजीवन विस्कळीत केले. सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली. दुपारी नदीने धोक्याची पातळीही ओलांडली. त्यामुळे बदलापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला आणि संध्याकाळी पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली.

बदलापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता. त्यात रायगड जिल्ह्यातील कर्जत माथेरान पट्ट्यातही पावसाचा जोर असल्याने सकाळपासून उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. दुथडी भरून वाहत असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढून उल्हासनदीने १७.५० मी ही धोक्याची पातळीही ओलांडली. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने बदलापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली होती. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सकाळपासून शहराच्या भागात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला.

तसेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. उद्घोषणा करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर खबरदारी म्हणून काही वेळ उल्हासनदी पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नदी परिसरात अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.

उल्हास नदी परिसरात ठिकठिकाणी शहरांसह गावे मोठ्या प्रमाणात विस्तारली आहेत. पाऊस असाच राहिला तर या गावांना ही सतर्कतेचा इशारा दिला जाऊ शकतो. त्यामुळे नदी काठावर, डोंगराळ भागात, धबधब्याचे ठिकाणी, नदीच्या पाण्यात, धरण क्षेत्र आधी ठिकाणी पावसाच्या कालावधीत नागरिकांनी जाण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा